ईडीची सर्वात मोठी कारवाई; तब्बल पाच राज्यात छापेमारी
![ईडीची सर्वात मोठी कारवाई; तब्बल पाच राज्यात छापेमारी ED](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/ED-780x437.jpg)
नवी दिल्ली : मागील काही दिवसांपासून देशासह राज्याच्या राजकीय वातावरणात अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) आज देशभरात अनेक ठिकाणी छापेमारी केली आहे. यात झारखंड, हरियाना, राजस्थान, पश्चिम बंगाल, बिहार अशा तब्बल पाच राज्यात १८ ठिकाणी छापेमारी केली आहे. शुक्रवारी सकाळी ईडीनं केलेली ही सर्वात मोठी कारवाई आहे. एका महिला सनदी अधिकाऱ्यांच्या कार्यालयावरही ईडीनं छापा टाकल्यानं खळबळ उडाली आहे.
दरम्यान, झारखंडची राजधानी रांची येथील पल्स हाँस्पिटल शिवाय पंचवटी रेसिडेंट, कांके रोड, चांदनी चौक, हरिओम टॅावर येथे ईडीने छापेमारी केली आहे. झारखंडच्या खनिज आणि भूवैज्ञानिक विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांचीही चौकशी ईडी करत आहेत. पूजा सिंघल आणि उद्योगपती अमित अग्रवाल यांच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकला आहे. पूजा सिंघल यांचे घर, कार्यालयावर केलेल्या ईडीच्या कारवाईचे फोटो समाजमाध्यमांवर शेअर झाले आहेत. आपल्या पदाचा गैरउपयोग करुन १८ कोटी रुपयांच्या सरकारी संपत्तीत गैरव्यवहार झाल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.