पंधरा राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला निवडणूक

नवी दिल्ली : देशभरातील १५ राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यांत महाराष्ट्रातील ६ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, पी. चिदंबरम, विनय सहस्त्रबुद्धे, पीयूष गोयल, विकास महात्मे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपणार आहे. या निवडणुकीसाठी ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असून १० जूनला मतदान होणार आहे.
सध्या राज्यसभेवर महाराष्ट्रातून शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून पी. चिदंबरम तर भाजपकडून पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे सहा खासदार असून ते आता निवृत्त होणार आहेत.
शिवसेनेकडून राऊत, राष्ट्रवादीकडून पटेल तर पी. चिंदबरम यांना तामिळनाडूमधून डीएमकेच्या सहकार्यानं निवडून आणलं जाऊ शकते. पण काँग्रेसचा राज्यसभेतील महाराष्ट्राचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. तसेच पियूष गोयल हे स्वतः केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळं ते पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धेंना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.