पुणे विद्यापीठात परस्पर संवादाचा आहे अभाव
डॉ. करमळकर यांची स्पष्टोक्ती
पुणे ः ‘विद्यापीठामध्ये काही विभागांमध्ये परस्पर संवादाचा अभाव आहे. काही ठिकाणी तर एकाच विभागात संवाद होताना दिसत नाही. हा विसंवाद टाळला तर येणार्या काळात विद्यापीठात खर्या अर्थाने लिबरल शिक्षण दिले जाईल, असे डॉ. नितीन करमळकर यांनी सांगितले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात आयोजित ‘फंडामेंटल्स ऑफ डिजीटल जर्नालिजम’ या पुस्तकाचे डॉ. करमळकर यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पुस्तकाचे प्रकाशन विश्वकर्मा प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे. कार्यक्रमात विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या विभागप्रमुख डॉ. उज्ज्वला बर्वे, डॉ. किरण ठाकूर, डॉ. योगेश जोशी आणि डॉ. मकरंद पंडित, डॉ. संजय तांबट आदी उपस्थित होते.
शिक्षणपद्धतीमध्ये तातडीने बदल करण्याची गरज असून चॉइस बेस्ड क्रेडिट पद्धती आणि लिबरल शिक्षण यावर शिक्षणपद्धती अवलंबून असायला हवी. नव्या शैक्षणिक धोरणामध्ये यावरच भर देण्यात आला आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मी सातत्याने नवीन शिक्षणपद्धती अवलंबण्याचा प्रयत्न केला. यामुळे विद्यापीठाच्या बाहेर काय घडते आहे, याची जाणीव विद्यार्थ्यांना होईल,’ अशी स्पष्टोक्ती डॉ. करमळकर यांनी दिली.