सांडपाणी प्रक्रियेची महापालिका करणार पाहणी
![सांडपाणी प्रक्रियेची महापालिका करणार पाहणी PCMC 2](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/05/PCMC-2-780x470.jpg)
गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सांडपाण्यावर, तसेच घनकचर्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प कार्यान्वित नसल्याच्या बर्याचशा तक्रारी पालिका आयुक्त पाटील यांच्याकडे आल्या आहेत. त्या त्या क्षेत्रीय अधिकार्यांनाही याबाबतचा अहवाल दिला होता.
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रियेची महापालिकेचे पथक पाहणी करणार आहे. ज्या सोसायटीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही, अशा सोसायट्यांना एक महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रक्रिया सुरू न केल्यास पालिकेच्या ड्रेनेज लाइनला जोडलेले सोसायटीचे ड्रेनेज कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे. शहरात पाण्याची समस्या गंभीर होत असतानाच बागकाम, रस्ते साफसफाई, फ्लशिंग, गाड्या धुणे, इतर वापरासाठी पाण्याचा पुनर्वापर होताना दिसून येत नाही. पिण्याच्या पाण्याचा वापर वाढला असून ऐनउन्हाळ्यात पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका कार्यक्षेत्रात सुमारे साडेतीन हजारपेक्षाही जास्त सोसायट्या आहेत. या सोसायट्यांमध्ये घनकचरा व सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचे प्रकल्प कार्यान्वित नसल्याच्या तक्रारी पालिका आयुक्त पाटील यांच्याकडे आल्या होत्या. क्षेत्रीय अधिकार्यांनीही याबाबतचा अहवाल दिला होता. त्यानंतर आयुक्तांनी हाउसिंग कॉम्प्लेक्स, सोसायट्यांमधील अध्यक्ष, सचिव यांच्याबरोबर बैठक घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तसेच सोसायट्यांना जलशुद्धीकरण व मैलाशुद्धीकरण प्रकल्पांसाठी महावितरणकडून सवलतीमध्ये देण्यात येणार्या वीजदराची माहिती दिली होती. त्यानंतरही काही सोसायट्यांनी सांडपाणी प्रक्रिया सुरू केली नाही.
महापालिकेचे पथक शहरातील सर्व मोठ्या सोसायट्यांमधील सांडपाणी प्रक्रियेची पाहणी ३१ मेपूर्वी करणार आहे. ज्या सोसायटीमध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही, अशा सोसायट्यांना १ महिन्याची नोटीस देण्यात येणार आहे. त्यानंतरही प्रक्रिया सुरू न केल्यास पालिकेच्या ड्रेनेज लाईनला जोडलेले सोसायटीचे ड्रेनेज कनेक्शन बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा महापालिका आयुक्त पाटील यांनी परिपत्रकातून दिला आहे.