क्रीडा

बॉक्सर निखतने उमटवली सोनेरी मोहोर

नवी दिल्ली : इस्तंबूल येथे झालेल्या १२व्या महिला जागतिक अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत भारताची बॉक्सर निखत झरीनने (५२ किलो) सुवर्णपदकाची कमाई केली. जागतिक स्पर्धेत सोनेरी मोहोर उमटवणारी ती भारताची पाचवी महिला बॉक्सर ठरली आहे.
नुकत्याच झालेल्या ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम लढतीत निखतने थायलंडच्या जितपोंग जुतामासचा ५-० असा धुव्वा उडवला. पाचही पंचांनी अनुक्रमे ३०-२७, २९-२८, २९-२८, ३०-२७, २९-२८ अशा गुणफरकाने निखतच्या बाजूने निकाल दिला.
त्यामुळे एमसी मेरी कोम (२००२, २००५, २००६, २००८, २०१० आणि २०१८), सरिता देवी (२००६), जेनी आरएल (२००६) आणि लेखा केसी (२००६) यांच्यानंतर जगज्जेती म्हणून मिरवण्याचा मान निखत झरीनने मिळवला आहे. निझामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेल्या निखतने अंतिम लढतीत अपेक्षेनुसार आक्रमक खेळ केला. तीन मिनिटांच्या पहिल्या फेरीत सुरुवातीपासून निखतने वर्चस्व प्रस्थापित केले.

उपांत्य फेरीत तीन वेळा विश्वविजेत्या कझाकस्तानच्या झाइना शेकेर्बेकोव्हाचा पराभव करणार्‍या जुतामासने आपल्या आक्रमणाचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. मात्र, निखतने भक्कम बचाव करीत तिचे आक्रमण परतवून लावले. दुसर्‍या फेरीतही २५ वर्षीय निखतने आपल्या उंचीचा फायदा घेतला. तिने प्रतिस्पर्धी जुतामासपासून अंतर ठेवले. त्यामुळे जुतामासने प्रतिहल्ला करण्याच्या प्रयत्नात चुका करण्यास सुरुवात केली. निखतने याचा फायदा घेत या फेरीतही आपले आक्रमक वर्चस्व प्रस्थापित केले. तिसर्‍या फेरीत आघाडीवर असूनही निखतने अधिक आक्रमकता दाखवली. त्यामुळे जुतामासला बचावावर भर देणे भाग पडले. निखतने समोरच्या दिशेने अचूक मुक्के मारत जुतामासवर दडपण टाकले. तिच्या आक्रमणापुढे जुतामासचा निभाव लागला नाही. मात्र, सर्व पंचांनी निकाल निखतच्या बाजूने दिल्याने तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली. एकूण तीन पदके : निखतच्या आधी मनीषा (५७ किलो) आणि परवीन (६३ किलो) यांनी कांस्यपदके पटकावली होती.

त्यामुळे ७३ देशांतील ३१० बॉक्सिंगपटूंचा सहभाग असलेल्या यंदाच्या स्पर्धेत भारताला एकूण तीन पदके मिळाली. भारताच्या १२ पैकी आठ बॉक्सिंगपटूंना उपांत्यपूर्व फेरी गाठण्यात यश आले. निखतने भारताला महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील १० वे सुवर्णपदक जिंकून दिले आहे. यापैकी सहा सुवर्णपदके एमसी मेरी कोमने पटकावली आहेत. निखतच्या यशामुळे भारताची महिला जागतिक स्पर्धेतील पदकसंख्या ३९ (१० सुवर्ण, ८ रौप्य, २१ कांस्य) झाली आहे. रशिया (६०) व चीन (५०) यांनीच भारतापेक्षा चांगली कामगिरी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये