कव्हर स्टोरी

सोशल मीडियामुळे हरपला संवाद…

माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग जवळ आले आहे. मात्र नातेसंबंध दूर आणि विरळ होत चालले आहेत का, असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती निर्माण होत आहे. शेजारी मित्र-नातेवाईक यांच्यामध्ये होत असणारा सहज, नैसर्गिक संवाद हरवत चाललेला आहे. आभासी जगामध्ये बहुतेकजण रमताना दिसत आहे. मात्र या आभासी जगाला कवटाळण्यापेक्षा वास्तवातल्या नात्यांना दृढ करणे हीच आता आत्यंतिक गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे सोशल मीडियामुळे संवाद हरपला का, असा प्रश्न मनामनात निर्माण होत आहे.

सध्याच्या दिवसांत सोशल मीडिया हा आपल्यापैकी बहुसंख्य जणांच्या आयुष्याचा एक अविभाज्य असा घटक झाला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, पिंटरेस्ट, कोरा इत्यादी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत आणि त्यावर जवळपास दिवसभर असणारा आपला वावर, हा लक्षणीय प्रमाणात असतो. आपले विचार या माध्यमांतून आपण लोकांसमोर मांडत असतो. इतरांचे विचार वाचत, ऐकत असतो. प्रसिद्ध व्यक्तींपासून ते सर्वसामान्यांपर्यंत जवळपास सर्वचजण ही माध्यमे हाताळत असतात. ‘व्यक्त व्हायचा अधिकार’ बजावण्याकरता आपण बरेच उत्सुक असतो.

सध्या सोशल मीडियाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे एकमेकांतील संवाद संपत चाललेला आहे. लाइफ पार्टनरसोबत लाइफटाइम राहण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर करता आला पाहिजे. तरी सोशल मीडियाचा वापर करताना नाते प्रथम टिकवले पाहिजे, याचे सर्वांनाच भान हवे. सोशल मीडियाचा जितका फायदा, तितकाच तोटा आहे. त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकारे करणे गरजेचे आहे. सोशल मीडियाचा नात्यावर विपरीत परिणाम होऊ देऊ नका. सध्या लहान मुलेसुद्धा सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये चिडचिडेपणा, स्वमग्नता खूप वाढलेली दिसत आहे. त्यांच्यावरसुद्धा पालकांनी नियंत्रण ठेवायला हवे

सुजाता शानमे (सहायक पो.नि.)

सोशल मीडियाचे आभासी जग आपल्या जीवनाचा अभिवाज्य भाग झाले आहे. सोशल मीडियाचा प्रभावी वापर केला, तर अनेक प्रश्न सहज सुटणे शक्य झाले आहे. मात्र, त्याचा अतिवापर नातेसंबंधाच्या मुळावर आला आहे. कौटुंबिक नात्यातील ओलावा टिकविण्याबरोबरच त्याचा गैरवापर नात्यात दुरावा निर्माण करू लागला आहे. सोशल मीडियाचा योग्य प्रमाणात वापर केला तर त्याचा नक्की फायदा होतो; पण आता सोशल मीडियाच्या वापराचे लोकांना व्यसन लागले आहे.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. बर्‍याचदा लोकांना कोणती तरी भीती किंवा आमिष दाखवूनसुद्धा फसवणूक केली जाऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा जेवढा फायदा आहे तेवढा तोटासुद्धा आहे. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. यात तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. सोशल मीडियाचा योग्य तेवढा वापर करा, जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही. जसा तुम्ही तुमचा मास्क प्रायव्हेट ठेवता, तशी मोबाइलमधील माहितीसुद्धा कोणाशीही कधीच शेअर करू नका. सध्या सायबर क्राइम मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

सचिन कांडगे (सहायक पो.नि.)

नातेसंबंध जोपासण्यासाठी सोशल मीडिया फायद्याचा ठरतो की, त्याचे दुष्परिणाम अधिक आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये नातेसंबंधांमध्ये आलेल्या तणावामुळे ब्रेकअप होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. दोन व्यक्तींमधील मतभेद इतके टोकाला जातात की, त्यातून त्यांना एकत्र राहाणे शक्यच होत नसते. नात्यातील या ताणाला वेळीच आवर घालता आला पाहिजे.

नात्यांमधील दुराव्याची लक्षणे वेळीच ओळखल्यास त्यावर उपाययोजना करणेही सोपे जात असते. अनेक जोडपी आपल्यातील वाद सोडविण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेतात. संवाद हरपला की, नात्यात दुरावा निर्माण होणे साहजिकच असते. त्यामुळे संवाद हा दोन नाते टिकवण्यासाठी महत्त्वाचा दुवा आहे. दुरावा किंवा नाराजी यामुळे काही वेळा नात्यातील वातावरण इतके बिघडते की, जोडीदारांना वेगळे व्हावे लागते. नात्यातील समस्यांमुळे काही वेळा लोकांना नैराश्य येऊ लागते. ते वेगळ्या पद्धतीने वागू लागतात, ज्यामुळे त्यांना त्यांच्या प्रियजनांपासून वेगळे करणे सुरू होते.

सोशल मीडियामुळे आपल्या दैनंदिन जीवनात होत असणारी ढवळाढवळ किंवा टर्ब्युलन्स आपण भारतीय, सध्याच्या काळात अनुभवतो आहोत. अमेरिका किंवा युरोपच्या तुलनेत तंत्रज्ञान आपल्याकडे काही वर्षे उशिरा पोहोचतं. आपल्याकडे स्मार्टफोन वापरणं कॉमन झालं त्याला नुकतीच सहाएक वर्षे होत आहेत. फोरजी तंत्रज्ञान केवळ एक ते दीड वर्षच जुनं आहे. तंत्रज्ञान प्रगत झालं, हाती स्मार्टफोन आला आणि स्वस्त इंटरनेट दरांमुळे दिवसागणिक, माणसे फोनला चिकटून बसू लागली.

एखाद्या व्यक्तीच्या पोस्ट, फोटोज फॉलो करणे, त्या आवडणे आणि मग त्या व्यक्तीच्या, सोशल मीडियावर दिसणार्‍या प्रतिमेशी, प्रमाणापेक्षा जास्त जवळीक किंवा ओढ वाटणे हे यथावकाश सुरू झालं. यात भर म्हणून ‘इनबॉक्स’ आहेतच. एखाद्या व्यक्तीचे आणि आपले समान आवडीतून दुवे जुळणे आणि त्यातून व्यक्तिगत किंवा खासगी अशी संभाषणे इनबॉक्समधे चालणे हे प्रमाण वाढू लागलं. करण्यासारखं विशेष काम हाती नसेल, तेव्हा अगदी सहज म्हणून फोन हाती घेतला जातो आणि हे इनबॉक्स संभाषण वाढू लागतं. कधीकधी तर कामाच्या वेळातही, आपण मल्टीटास्किंग करू शकतो, या गैरसमजुतीपोटीदेखील फोन प्रचंड प्रमाणात वापरला जाऊ लागतो.

टीनएजर्स, तरुण मुलं, मध्यम वयोगटातली माणसे सोशल मीडियाचा केवळ एक ‘डेटिंग प्लॅटफॉर्म’ म्हणून वापर करू लागली. याबाबतीत प्रत्येकाची आपापली कारणे आहेत. टीनएजर, तरुण मुलंमुली एरवीच्या मित्र-मैत्रिणींव्यतिरिक्त, एकमेकांची ओळख करून घेऊन नाती जोडू पाहतात. पस्तीशी-चाळीशीच्या घरातल्या मध्यमवयीन व्यक्ती, सेट रूटीन, घरातल्या व बाहेरच्या समस्या आणि ‘मिडलाइफ क्रायसिस’ नावाच्या अवघड फेजमधून जात असताना नवनवी नातेजोड करू पाहतात. साधारण पंचेचाळीस ते पन्नास वयोगटातली लोकं स्थिरावलेली असतात.

पन्नास-पंचावन्न नंतरची लोकं बरेचदा टेक्नोसॅव्ही नसणे किंवा सोशल मीडिया या प्रकारात एकूणच कमी रस असल्यानं त्यात फारशी रमताना दिसत नाहीत. ‘इनबॉक्स चॅट’ हा प्रकार तसा डेंजरस. सोशल मीडियावर दिसणार्‍या एखाद्या व्यक्तिमत्त्वाप्रती असणारं आकर्षण आणि त्यातून सुरू होणारं खासगी संभाषण हे तसं नित्याचं ! समान आवडीच्या एखाद्या विषयावरून चर्चा सुरू होणे आणि हळूहळू गाडी भलतीकडे वळणे, हा या इनबॉक्स संवादाचा प्रचंड मोठा दोष आहे. कॉलेजला जाणार्‍या प्रत्येक विद्यार्थ्याकडे मोबाइल असतो. त्यापैकी अनेक विद्यार्थी तासन्तास फोनवर बोलताना दिसतात. अगदी शालेय विद्यार्थ्यांनाही फेसबुकचे जणू व्यसन लागले आहे.

सोशल मीडियाच्या वापराने आपल्याला जगाशी कनेक्ट होता येते, पण त्याचा अतिवापर टाळण्याची गरज आहे. वास्तविक सोशल मीडियाचा वापर योग्य माहितीचा प्रसार करण्यासाठी केला पाहिजे. माहितीची सत्यता पडताळून जर ती शेअर केली तर,
लोकांना चांगली आणि योग्य माहिती मिळू शकते. आपण किती वेळ सोशल नेटवर्किंग साईट्सचा वापर करतो आणि तो कशासाठी करतो, याचा विचार करायला हवा. ट्वीटर, फेसबुक, इन्स्टाग्राम ही सगळी सोशल मीडियाची साधने आपणा सर्वांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहेत.

देशविदेशातील हकिकती असोत किंवा जगाच्या पाठीवर सगळीकडे असलेल्या आपल्या मित्रमंडळी, नातेवाइकांशी संपर्क साधणे असो, हे सर्व आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातूनच होत असते. एका रिसर्चच्या नुसार सर्वसाधारण व्यक्ती दिवसाचे चार ते पाच तास सोशल मीडियाचा वापर करीत असते. पण काही व्यक्तींना या माध्यमांचे अगदी ‘अ‍ॅडिक्शन ‘ झालेले असते. अशा व्यक्ती आपली तहानभूक सर्व काही विसरून केवळ सोशल मीडियाच्या माध्यमांमध्ये रमून जात असतात. अशा व्यक्ती दिवसाचे सोळा ते अठरा तासदेखील या माध्यमांच्या वापरामध्ये घालवितात.

सोशल मीडियामध्ये चर्चिल्या जाणार्‍या प्रत्येक विषयावर मत देण्याचा मोह या व्यक्तींना आवरता येत नाही आणि ही सवय ‘अ‍ॅडिक्शन‘ कधी बनते, हे कळतच नाही. असे हे सोशल मीडियाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. कुठल्या ना कुठल्या विषयावर मतप्रदर्शन करण्याचा मोह काही व्यक्तींना आवरता येत नाही आणि आपली ही हौस अशा व्यक्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून भागवून घेत असतात. असे करताना ते सोशल मीडियाच्या आहारी कधी जातात, हे त्यांचे त्यांनाच कळत नाही. पण प्रत्येक बाबतीत मतप्रदर्शन करणे आवश्यक नाही.

तुम्ही मांडत असलेल्या मतांमुळे तुमची प्रतिमा नकारात्मक होऊ शकते. सोशल मीडियावरून एखादी माहिती किंवा घटना शेअर करीत असताना किंवा त्यावर मतप्रदर्शन करीत असताना, त्या माहितीचा किंवा आपल्या मताचा आसपासच्या लोकांवर काय परिणाम होऊ शकतो याचा विचार करणे गरजेचे आहे. आपण शेअर करीत असलेला कंटेंट आपल्याला कितीही चांगला वाटत असला, तरी तो इतरांना पटेल किंवा रुचेल असे नाही. त्यामुळे असे कंटेंट शेअर करणे टाळा. जेणेकरुन अनुचित प्रकार घडणार नाही व संवाद हरपणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये