सर्व समविचारी पक्षांना एकजुटीची गरज
‘संपूर्ण देशात चातुवर्ण्य व्यवस्था येतोय की काय, अशी भीती वाटत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समतेवर आधारित चळवळ उभी करावी लागणार आहे. बाबासाहेबांनी विचारांची लढाई लढविली आणि त्यातून समाज क्रांती झाली.’
पुणे : आगामी काळात येणार्या राजकीय परिस्थितीत सर्व समविचारी पक्षांना एकजूट करण्याची गरज असून, त्यासाठी काँग्रेसने पुढाकार घ्यायला हवा. देशात व्यापक समविचारी पक्षांची आघाडी होणे आणि पर्यायी विरोधी पक्ष उभा करण्याची जबाबदारी काँग्रेसची आहे. आता काँग्रेस पक्षाने लोकशाही बळकट करून नेतृत्व करायची भूमिका घेतली नाही, तर पुढील प्रवास खडतर असून, त्याचीच चिंता वाटते,’’ असे परखड मत मांडत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आपल्याच पक्षाला घरचा अहेर दिला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टडीज आणि महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. श्रीपाल सबनीस लिखित ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रणीत सामाजिक क्रांती’ या ग्रंथाचे प्रकाशन शनिवारी झाले.
चव्हाण म्हणाले, ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेली लोकशाही टिकविण्यासाठी तयार केलेली चौकट म्हणजे संविधान आहे आणि ही लोकशाही टिकविण्याची दुसरी सामाजिक क्रांती आपल्याला करावी लागणार आहे. राजकीय पक्ष हे संसदीय लोकशाहीचा आधार आहेत. राजकीय पक्ष संघटना दुर्बल होणे, ही चिंतेची बाब आहे.’ ‘राजकीय पक्ष हे ध्येयापासून दूर जात असतील, तर लेखक, वाचक, नागरिकांनी काय करावे. महापुरुषांना घातलेली जातीची, धर्माची जानवे आता जाळावी लागतील.
महापुरुष हे डावे-उजवे, जाती-धर्माचे नसतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे नाहीत, तर ते मानवतावादी विचारांचे आहेत,’ असे मत ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले. कार्यक्रमात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, आमदार डॉ. सुधीर तांबे, विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे, सभेचे कार्याध्यक्ष सचिन ईटकर आदी मान्यवर उपस्थित होते.