दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी क्रॅक केलेली तन्मई देसाई म्हणते, “अपयश आले तर…”; वाचा तन्मईची सक्सेस स्टोरी
![दुसऱ्याच प्रयत्नात युपीएससी क्रॅक केलेली तन्मई देसाई म्हणते, "अपयश आले तर..."; वाचा तन्मईची सक्सेस स्टोरी upsc 1010](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/upsc-1010-780x470.jpg)
पुणे – UPSC Aspirant Success Story | लहानपणापासून काहीतरी वेगळे करून दाखवायचे आणि माझ्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करायची जिद्द मी बाळगली. त्यादृष्टीने मी रात्रंदिवस अभ्यास सुरू करीत प्रयत्न सुरूच ठेवला असल्याचे यूपीएससी परीक्षेत २२४ वा (UPSC AIR 224) नंबर मिळवत आकाशाला गवसणी घालणारी तन्मयी देसाई (Tanmai Desai) हिने दै. ‘राष्ट्रसंचार’शी बोलताना सांगितले.
यूपीएससी २०२१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यंदाच्या वर्षी या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. पुण्याबरोबरच पिंपरी-चिंचवडमधूनदेखील मुलींनीच बाजी मारली आहे. निगडी येथील तन्मयी देसाई हिचाही यात समावेश आहे. तन्मयी म्हणाली की, २०२० दरम्यान पहिली यूपीएससीची परीक्षा दिली तेव्हा अपयश आले.
मनाशी जिद्द बाळगत स्वप्नपूर्तीकडे वाटचाल करीत कठोर परिश्रम घेत दुसर्यांदा परीक्षेला सामोरे जात त्यामध्ये आकाशाला गवसणी घालत देशात २२४ वा क्रमांक मिळवित यूपीएसी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. २०१३ मध्ये वडिलांचे निधन झाले. अख्ख्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असतानासुद्धा फक्त मनामध्ये जिद्द आणि स्वप्नपूर्तीसाठी वाटचाल करताना अनेक संकटांवर मात करत हे यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्याने अभ्यासावर लक्ष केंद्रित करीत जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. त्याबरोबर चांगले नागरिक बनणे हीपण फार मौल्यवान गोष्ट आहे. सध्या या परीक्षेत मिळालेले हे यश नक्कीच मोठे आहे, विश्वास बसत नाही. एखाद्या वेळेस अपयश आले तर त्या अपयशाने खचून न जाता जोमाने कठोर परिश्रम घ्या, निश्चितच यश तुम्हाला मिळेल.
_तन्मयी देसाई, (यूपीएससी उत्तीर्ण ‘२२४ वा’)
निगडीमधील ज्ञानप्रबोधिनीमध्ये शिक्षण घेत इयत्ता १० वीमध्ये ९५ टक्के गुण मिळवले. त्यानंतर फर्ग्युसन कॉलेजमध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत मानसशास्त्र विभागात प्रावीण्य मिळविले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण बंगळुरू येथे पूर्ण केले. त्यानंतर २०२० मध्ये प्रथम प्रयत्नात अपयश आले, परंतु या अपयशाने न खचता अथक परिश्रमानंतर तिने यश संपादन केले.
अपयशाने खचून न जाता जोमाने ध्येयाला गवसणी घालणार्या तन्मयीचा खडतर प्रवास इतरांना नक्कीच प्रेरणा देणारा आहे. यंदाच्या यूपीएससीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारल्याचे पाहायला मिळाले. तन्मयी देसाई या तरुणीने यूपीएससीत यश मिळवित पुणे-पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
संपूर्ण घरात यूपीएससीत यशस्वी होणारी तन्मयी ही पहिली मुलगी आहे. दहावीत उत्तम गुण असूनही तन्मयीने आर्ट्सकडे वळायचे ठरवले. मानसशास्त्रामध्ये तिला आवड निर्माण झाली आणि पुढे पदवीचे शिक्षण फर्ग्युसन आणि पदव्युत्तर शिक्षण क्राइस्ट बंगळुरू येथून पूर्ण केले. तन्मयीने पदव्युत्तर शिक्षणानंतर निश्चयी मनाने यूपीएससीसाठी तयारी सुरू केली. तन्मयीचे सर्वच स्तरांतून अभिनंदन होत आहे.