आ. महेश लांडगे यांना ‘स्व. बी. के. कोकरे पुरस्कार’
![आ. महेश लांडगे यांना ‘स्व. बी. के. कोकरे पुरस्कार’ sunil shelake](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/sunil-shelake-780x470.jpg)
पिंपरी : रुपीनगर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानतर्फे भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांना ‘स्व. बी. के. कोकरे’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राज्याचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार वितरण करण्यात आला.
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मोत्सव व शोभायात्रा आयोजित केली होती. त्यावेळी प्रा. राम शिंदे, बाळासाहेब दोलतोडे, हिंदू एकताचे मिलिंद एकबोटे, ऑल इंडिया धनगर समाजाचे अध्यक्ष प्रवीण काकडे उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणार्या मान्यवरांचा गौरव करण्यात आला. त्यामध्ये डॉ. राम तांबे (वैद्यकीय क्षेत्र), डॉ. राजेश पुणेकर (कायदेतज्ज्ञ), शांताराम दगडू भालेकर (सामाजिक), सुबोध गलांडे (शैक्षणिक), सागर चव्हाण (गोरक्षण), निसर्गराजा मित्र जिवांचे (पर्यावरण रक्षण) आदींचा समावेश आहे.
प्रा. राम शिंदे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेने अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे; परंतु केवळ जागा उपलब्ध करून चालणार नाही. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यातून आमचे अनेक बांधव पोट भरायला आलेली आहेत. ते एक-दोन कोटी रुपये खर्च करू शकत नाही. आपल्यावर वर्गणी गोळा करून खर्च करण्याची वेळ येवू नये. यासाठी आमदार महेश लांडगे यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही प्रा. शिंदे यांनी केले.
आमदार महेश लांडगे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीच्या निमित्ताने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज मला स्वर्गीय बी. के. कोकरे विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्या पद्धतीने बी. के. कोकरे यांनी धनगर समाजासाठी काम केले होते, त्याच पद्धतीचे का विधानसभेत गाजवण्यासाठी प्रयत्नशील राहील. रुपीनगर परिसरात शोभायात्रा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त रुपीनगर, तळवडे भागात शोभायात्रा काढण्यात आली. उंट-घोडे, गजनृत्य, ढोल-ताशा पथक, हलगी वादन या यात्रेचे खास आकर्षण होते.