संस्कारितांच्या संख्येवर देश ठरतो बलशाही

कसबा गौरव पुरस्कार वितरण सोहळा
पुणे : सैनिक देशाचे आणि देशांच्या सिमांचे रक्षण करतात, त्यांचे कार्य अतुलनीय आहे. मात्र, कोणता देश बलशाली आहे, हे केवळ सैनिकांच्या शक्तीवर नाही. तर, त्या देशातील संस्कारित नागरिकांच्या संख्येवर ठरते. गुणवत्ता असलेल्या नागरिकांची संख्या ज्या देशात असते, तो देश ख-या अर्थाने शक्तीशाली असतो. भारतात संस्कार वर्गांच्या माध्यमातून संस्कारित नागरिक घडविण्याचे काम उत्तमपणे सुरु असल्याचे मत रा. स्व. संघाच्या कसबा भागाचे संघप्रमुख अॅड.प्रशांत यादव यांनी
व्यक्त केले.
कार्यक्रमात कसबा कार्य गौरव पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व साईनाथ मंडळ ट्रस्ट बुधवार पेठचे अध्यक्ष पीयुष शाह, कसबा गौरव पुरस्कार अष्टपैलू कलाकार वैष्णवी पाटोळे, राष्ट्रीय खेळाडू सार्थक चव्हाण यांना आणि बाल गौरव पुरस्कार सिने नाटय बालअभिनेता शर्व दाते यांना प्रदान करण्यात आला.
संस्काराचे पंख घेऊन माणूस जन्माला येत नाही. त्याला आई-वडिलांकडून संस्कार मिळतात. तपश्चर्येने प्रत्येक माणूस देवत्वाकडे पोहचू शकतो. त्याची सुरुवात संस्कार वर्गांतून होत असते. खर्या अर्थाने माणसातील संस्कारदीप प्रज्वलित करण्याचे काम संस्कार वर्ग करीत आहेत हे अॅड.प्रशांत यादव यांचे उद्गार मार्गदर्शनपर आहेत.
स्वरदा बापट म्हणाल्या, आजकाल मोबाईल, टिव्ही शिवाय लहान मुले जेवण देखील करीत नाहीत. तेव्हा अशा संस्कार केंद्राचे महत्व व जबाबदारी वाढत आहे. सर्वत्र सोशल मीडियाचा दुष्परिणाम वाढत असून लहान मुलांना चांगले नागरिक बनविणार्या संस्कार केंद्रामध्ये वाढ व्हायला हवी.
पीयुष शाह म्हणाले, मुलांच्या हातात मोबाईल आल्याने काळ बदलला आहे. संस्कारांसोबतच गुड टच बॅड टच सारख्या संकल्पना मुलांना समजावून सांगायला हव्यात. पालकांनी मुलांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास वेळ देण्याची गरज आहे.’
संस्कार माणसाला प्रत्येक क्षेत्रात उत्तम कार्य करण्यास मदत करत असतात. कोणत्याही क्षेत्रात उत्तम माणूस म्हणून केलेल्या कामालाच पोच पावती मिळत असते.