रंगरेषांचा किमयागार रवी परांजपे
एक चित्र एक हजार शब्दांपेक्षा श्रेष्ठ असते, असे मानले जाते. याचाच साधा सोपा अर्थ म्हणजे प्रत्येक चित्र बोलके असते. ते चित्र पाहणार्याला काही तरी सांगू इच्छित असते. हे सांगणे म्हणजे चित्रकाराचे मनोगत असते. ते आकृती, रंगरेषांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत किती परिणामकारकरीत्या पोहोचते, तेही तितकेच महत्त्वाचे असते.
त्रकलेच्या या मूलभूत अधिष्ठानाचे खरेखुरे पाईक म्हणता येतील असे चित्रकार म्हणजे रवी परांजपे. रंगरेषांच्या चतुरस्र कलाकर्तृत्वाने अवघ्या विश्वाला मोहिनी घालणारे ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांच्या जाण्याने सृजनशील कलाविश्वाचा साक्षीदार आणि कलेच्या इतिहासाचे महत्त्व अधोरेखित करणारा कलाकार आपल्यातून गेला आहे.
वर्ष १९३५ मध्ये उत्तर कर्नाटकात अर्थात बेळगावात जन्मलेले परांजपे जगभरात बोधचित्रकार म्हणून सुप्रसिद्ध आहे. जाहिरात आणि प्रकाशन या क्षेत्रात महत्त्वाची ठरणारी बोधचित्रकला, डिझाइन, वास्तुबोधचित्रकला आणि सृजनात्मक चित्रनिर्मिती अशा चित्रकलेच्या विविध अंगांना स्पर्श करीत गेली अनेक वर्षे चित्रकार रवी परांजपे, आपल्या वैविध्यपूर्ण चित्रनिर्मितीमध्ये त्यांच्या स्वतंत्र प्रतिभेचा, प्रज्ञेचा व अभ्यासपूर्ण चिंतनाचा प्रत्यय देत आले आहे.
धारवाड, हुबळी, बेळगाव अशा निसर्गरम्य परिसरात बालपण व्यतीत केलेल्या परांजपे यांना चित्रकलेची किंवा आजच्या भाषेत व्हिज्युअल आर्टची आवड निर्माण झाली होती. कलेचे दैनंदिन जीवनात असलेले स्थान अनन्यसाधारण असून डॉक्टर, इंजिनीअर अथवा वकील अशा व्यावसायिकांपेक्षाही चित्रकार- सृजनशील कलाकारांची समाजाला सर्वाधिक गरज आहे, अशी भूमिका घेऊन आयुष्यभर हा विचार जनसामान्यांत रुजवण्याचा प्रयत्न परांजपे यांनी केला.
त्याचबरोबर परांजपे यांनी १९६६ ते ६९ या काळात नैरोबी (केनिया) येथील जाहिरात क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केली. दक्षिण कोरियातून प्रसिद्ध होणार्या इंटरनॅशनल डिझाइन जर्नल या मासिकाने त्यांचा केलेला सन्मान तसेच अमेरिकन आर्टिस्ट्स अॅकॅडमीतर्फे जाहीर झालेला जागतिक पुरस्कार त्यांच्या कर्तृत्वाचा आवाका स्पष्ट करतो. परांजपे यांनी जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये त्यांना द बॉम्बे आर्ट सोसायटी’तर्फे रूपधर हा चित्रकला क्षेत्रातील प्रतिष्ठेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला होता.
‘तांडव हरवताना’, ‘नीलधवल ध्वजाखाली’, हे लेखसंग्रह; ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन, तर परदेशी चित्रकारांचा परिचय ग्रंथ असलेले पुस्तक म्हणजे ‘शिखरे रंग रेषांची’ अशा विविधांगी पुस्तकांनी परांजपे यांनी मराठी साहित्यातही मोलाची भर घातली आहे.
पुण्यातील मॉडेल कॉलनीमधला परांजपे यांचा स्टुडिओ, तेथील आर्ट गॅलरी आणि प्रांगणातील कलाकार कट्टा म्हणजे जुन्या-नव्या कलाकार मनांचे एक तीर्थक्षेत्रच बनले होते. विविध विषयांवरील चर्चा, व्यक्त होण्याच्या माध्यमातील बदल आणि कलाकाराची जीवनानिष्ठा याविषयी प्रगाढ चिंतन करणारा हा कलाकार आपल्यातून दूरच्या प्रवासाला निघून गेला आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.