अपयशाला जबाबदार कोण?
![अपयशाला जबाबदार कोण? RAJYASABHA RESULT MAHAVIKAS AGHADI](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/RAJYASABHA-RESULT-MAHAVIKAS-AGHADI-780x470.jpg)
आज भल्या पहाटे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडला आणि राजकारणात धूर्तपणा तसेच चाणक्यनीतीचा वापर कसा होऊ शकतो याचे मूर्तीमंत उदाहरण राज्यसंस्थेच्या मतदान प्रक्रियेवरून दिसून आले. राजकारणात वावरत असताना माणसाची मने ओळखून त्यांना आपलंसं करणे हे कसे शक्य होते हे आज लागलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीवरून स्पष्ट दिसून आले. आर्य चाणक्यांनी राज्यकारभार करताना जी १२ महत्त्वाची सूत्रे सांगितली आहेत, ती अत्यंत महत्त्वाची असून या सुत्रांच्या आधारेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी अतुलनीय कामगिरी करून दाखवली ती कौतुकास्पद तर आहेच, शिवाय ती राजकीय पुरुषार्थाची एक झलक मानावी लागेल.
महाराष्ट्रात सध्या राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकीय चातुर्य राजकीय शहाणपणा जो दिसून येतो त्यावरही फडणवीस यांनी मात केल्याचे दिसून येते. शनिवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना खुद्द शरद पवार यांनी देवेंद्रजींच्या या धूर्तपणाचा स्पष्ट उल्लेख करून देवेंद्रजींचे कौतुकही केले. माणसे जोडण्याची जी कला आहे त्या सुप्त शक्तीचे पवार यांनी कौतुक केले आणि त्यांच्या राजकीय जाणतेपणाचा माणसातला माणूस ओळखून तो जवळ करण्याचा यशस्वी प्रयत्न कसा असतो याचा उल्लेखही केला. एका धूर्त राजकारण्याने एक संयमी राजकारण्याचा केलेला हा गौरव अभिनंदनीय तर आहेच आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीतील या निकालाने कदाचित भावी राजकारणाची दिशा समजून येणार नाही, परंतु मविआला जो धक्का बसला तो अतर्क्य असा आहे. या निवडणुकीच्या दरम्यान मविआ, अपक्ष, विविध लहान पक्ष यांनी जी खेळी खेळलेली आणि तीचे रुपांतर विजयाच्या जल्लोषात कसे झाले त्याचे प्रत्यंतर आज दिवसभरात पहावयास मिळाले. निवडणूक कायद्यानुसार राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया ही थोडी किचकट आणि मतदारांना थोडीशी संभ्रमित करणारी असली तरी पटावर टाकलेल्या सोंगट्या आणि हातातून कवड्या टाकून मिळालेले दान यावर या सोंगट्यांची चाल अवलंबून असते. या डावात उंट हा नेहमी तिसरी चाल खेळत असतो आणि वजीर हा समोरच्याची खेळी सतत नापाक करीत असतो.
या निवडणुकीत नेमके हेच घडले. राजकारणात नेहमी समोरच्याचा विक पॉईंट काय आहे याचे अगम्य ज्ञान असते तोच अशा खेळात यशस्वी होत असतो. आपल्या ५ वर्षांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात माणसातला माणूस जोडण्याचे कसब देवेंद्रजींनी उपयोगात आणले. यात कधी पक्षाची तत्वप्रणाली आडवी यायची, पक्षातलाच एखादा आमदार नाराज व्हायचा, वरिष्ठांची असलेली मर्जी कदाचित कुठेतरी कमजोर व्हायची, या सगळ्या भावनांना मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी छेद दिला आणि समोरच्या पटलावरची सोंगटी तो माणूस देवेंद्रजींनी आपला केला.
राजकारणात माणूस ओळखणे, त्याला आपलंसं करणेही क्यनितीचे महत्वाचे सूत्र देवेंद्रजींनी या निवडणुकीत तंतोतंत पाळले आणि विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवून ठेवलेल्या सोंगट्यांच्याद्वारे विरोधकांचे मनसुबे उधळून लावले. सर्व गणिते तंतोतंत जुळवूनसुद्धा विरोधकांचे गणित चुकले आणि विजयाचा गुलाल कोल्हापूरच्या पैलवानाच्या अंगाला फासला गेला. शिवसेनेने संजय चव्हाण या निष्ठावंत सैनिकाची उमेदवारी शिवसेनेकडून जाहीर होताच अलिकडे का होईना पण पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या धनंजय महाडिक या उमेदवाराची निवड भाजपाने केली.
या चाणक्यनितीचे दुसरे पाऊल त्यांच्या विजयाचा साक्षीदार बनले गेले. पवारांसारख्या राजकीय भीष्माचार्याला या उमेदवाराची निवड कदाचित पसंत नव्हती अशी राजकीय चर्चा होत असताना भीष्माचार्यांच्या मनातली शंका मित्रपक्षाच्या नेत्यांच्या लक्षात आली असती तर कदाचित पराभवाचे खापर माथी मारण्याचे पाप घडले नसते. संजय पवार यांच्या तीस वर्षांच्या शिवसेनेच्या सैनिकत्वाची निष्ठेला तशी तोड नव्हती.
सामान्य शिवसैनिकाच्या राजकीय जीवनाला न्याय द्यावा ही भूमिका रास्त आणि स्वागतार्हच आहे. पण राजकीय खेळात कोण वरचढ ठरू शकतो याचे गणितही तितकेच महत्त्वाचे असते, हे मुळीच नाकारता येणार नाही. पहिल्या पसंतीची, दुसर्या पसंतीची मतं कुणाला कशा पद्धतीने द्यावीत याचे गणित मविआच्या नेत्यांनी जरुर बांधून ठेवले होते, पण राज्यकारभार करताना माणसे जवळ करण्याची भूमिका असावी लागते. त्यात मात्र सेना कमी पडली हे मुळीच नाकारता येणार नाही.
पक्षातल्याच अनेक आमदारांची नाराजी काही दिवसांपासून जशी उघड होत गेली तशी सरकारला बाहेरून पाठींबा देणार्यांची म्हणजेच अपक्षांच्या नाराजीची दखल ज्या प्रमाणात घेणे गरजेचे होते त्या प्रमाणात घेण्यात आलेली नाही ही सल त्यांच्या मनात घर करून राहिली. मतदार संघातील विकासाच्या काही योजना असतील, मतदार संघातील कित्येक वर्षांपासून रखडलेल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना असतील, कोणाला महामंडळाची अपेक्षा असेल किंवा कोणाला शासकीय यंत्रणेकडून अडवले जात असेल, या सर्वांचा परिणामस्वरुप जी खदखद होती ती या निमित्ताने पुढे आली.
मग हितेंद्र ठाकूर असतील, कदाचित संजय मामा शिंदे असतील किंवा त्यांचे सहकारी आमदार मित्र असतील, त्यांचे शल्य अचूकपणे हेरले गेले आणि नेमक्या या दुखण्यावर फडणवीसांच्या टिमने औषधोपचार केला असेल हे मुळीच नाकारता येणार नाही. जरुर दोन-तीन दिवसात झालेल्या बैठकांमध्ये प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन नाराजीचा सूर मावळण्याचा जरुर प्रयत्न झाला, पण खोलवर रुजलेल्या जखमेवर हा कायमस्वरुपी उपाय होऊ शकत नाही. या नाराजीला योग्य साथ देण्याचे प्रयत्न नरेंद्रजींनी केले आणि त्यात यशस्वी झाले. बाष्कळ आणि अनाठायी बोलून सेनेच्या काही नेत्यांनी (ज्येष्ठ म्हणणार्यांना) जी वायफळ बडबड केली, घोडेबाजार म्हणून हिणवण्याचा प्रयत्न केला, या नाराजीलाही बुस्टर डोस देण्याचा प्रयत्न भाजपने केला.
परिणामी हा प्रयत्न यशाच्या शिखरापर्यंत नेऊन पोहचवणारा ठरला. वास्तविक पाहता, याच वेळी वरिष्ठांनी या बोलण्याला थोडासा लगाम लावला असता तर आज हे दृष्य पहावयास मिळाले नसते. खुद्द सेनेतील काही नेत्यांना आणि असलेल्या कार्यकर्त्यांना हे बोलणे रुचणारे नव्हते, पण त्यांचाही यापुढे नाईलाज झाला. इतकेच नव्हे, तर मविआतील काही मंत्र्यांनासुद्धा हे बोलणे रुचण्यापलिकडचे होते हेही निर्विवाद सत्य नाकारता येणार नाही.
गेल्या वीस-बावीस वर्षात पहिल्यांदाच झालेली ही राज्यसभेची निवडणूक दोन्ही पक्षाकडून सामंजस्याच्या अलिखित करार करून बिनविरोध होऊ शकली असती, पण राजकारणात अहंकार आणि दुसर्याला कमी लेखणे हे कधीही परवडणारं नसतं. राजकारणात नेहमी तात्त्विक तडजोड आणि सिद्धांताच्या आधारावर सामंजस्य दाखवणे हा राजकीय सूज्ञपणाच शहाणपण असतं. या निवडणुकीत मतपत्रिका पक्षप्रतिनिधींना दाखवणे कायद्याच्या चाकोरीत असते. त्याचाही दोन्ही बाजूकडून अपभ्रंश करण्यात आला. हे गार्हाणं, तक्रारी दिल्लीतील मुख्य निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्या. तेथेही विविध पक्षांची दबाव प्रक्रिया सुरू होतीच. निवडणूक कार्यस्थळी बसवलेल्या कॅमेर्याच्या चित्रफितीतून आयोगाच्या जे निदर्शनास आल्याचा निर्णय झाला त्यामुळे डिवचण्याचाच प्रकार आहे त्याचा कळस झाला.
.राष्ट्रवादीचे अजित पवार, दिलीप वळसे-पाटील, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि सेनेचे एकनाथ शिंदे वगैरे यांनी केलेली व्यूहरचना सूत्रबद्ध होती, पण दुर्दैवाने जोडलेली माणसं टिकवून ठेवण्यासाठी जे कसब हवे असते तेच कमी पडले. हाच भाजपच्या विजयाचा खरा दावेदार ठरला.
_ बाळासाहेब बडवे, ज्येष्ठ पत्रकार