महागाईच्या भडक्याने खिशाला कात्री; बळीराजाचे जगणे झाले कठीण
रांजणी – Infaltion Analytical चालू वर्षीचा पावसाळा सुरू झाला आहे. आता काही दिवसांतच खरीप हंगामालादेखील सुरुवात होईल. खरीप हंगामासाठी बळीराजाची तयारी सुरू झाली आहे. परंतु कधी नव्हे ती आर्थिक चणचण बळीराजा आता अनुभवतोय. त्याला महागाईच्या सर्वाधिक झळा बसत आहेत. घरगुती किराणापासून तर पेट्रोल-डिझेलपर्यंत सर्वच दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर गगनाला भिडल्याने बळीराजाचे जगणे मुश्किल झाले आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांत कोरोनाने शेतकर्यांना ग्रासले त्यामुळे शेतकर्यांच्या अर्थार्जनाला हातभार लागण्याऐवजी तोटाच मोठ्या प्रमाणात झाला. निरपराध शेतकर्यांचे कोरोनाकाळात जीवही गेले. महागाईचा भडका शेतकर्यांच्या खिशाला दररोज कात्री लावत आहे. मागील दोन-तीन वर्षांत शाळांचे प्रवेश शुल्कदेखील अव्वाच्या सव्वा झाले.
गेल्या दोन-अडीच वर्षांमध्ये उदरनिर्वाहाच्या घटकांमध्ये जवळजवळ दुप्पटी – तिपटीने वाढ झाली आहे. इंधनाचे दर आवाक्याबाहेर गेल्याने प्रवास करणेदेखील अवघड झाले आहे. वाढलेली महागाई आणि शेतमालाचे घसरलेले दर याचा मोठा फटका शेतकरी कुटुंबालाच बसत आहे.
_सुधाकर भोर, शेतकरी, रांजणी (ता. आंबेगाव)
कधी आठ ते दहा हजार रुपये शुल्क घेणार्या शाळांमध्ये आता वीस ते पंचवीस हजार रुपये मागितले जात आहेत. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे शाळेच्या शुल्कात सवलत दिली गेली होती. आता सर्व काही सुरळीत झाल्याचे सांगत खासगी संस्थाचालक शाळा शुल्कवाढीचे समर्थन करीत असल्याचे दिसून येते. पेट्रोल-डिझेल महागल्याने प्रवास खर्चदेखील ४० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
सध्याचा जमाना हा आधुनिक शेतीचा झाला आहे. पूर्वी शेती बैलांच्या सहाय्याने केली जात होती, परंतु आता शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर सांगितले तर एकराला आता हजार रुपयांपेक्षा अधिक रुपये द्यावे लागतात. मशागतीच्या प्रकारानुसार ही रक्कम वाढत जाते. एकूणच बदलता निसर्ग आणि अनिश्चित बाजारपेठ या परिस्थितीत शेतकर्याची आर्थिक तारांबळ होताना दिसून येते. आर्थिक ताळमेळ जुळवताना दमछाक होत आहे. किराणा मालाच्या दरात तिपटीने वाढ झाली आहे.
खाद्यतेलाचे भाव किलोला ७५ रुपयांवरून १७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत, असे प्रत्येक वस्तुमध्ये दिसून येते. प्रवास खर्च महागला, वीजबिलामध्ये दुप्पट वाढ झाली. शेतीमध्ये यांत्रिकीकरण मोठ्या प्रमाणावर झाले, त्यासाठी वापरली जाणारी यंत्रे, तसेच डिझेल दीडपटीने वाढले त्यामुळे शेतीमशागतीवर दुप्पट खर्च करावा लागत असल्याचे चित्र सध्या दिसून येते.
गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये बी – बियाणे आणि रासायनिक खते त्याचबरोबर कीटकनाशके सातत्याने महाग होत आहेत. घोडेगाव येथील शेतकरी नितीन दरेकर म्हणाले, कोरोनापासून महागाई सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली आहे. शेतमालाचे भाव मात्र तसे वाढलेले नाहीत. आज कांद्याला कोणी विचारत नाही, शाळेचे शुल्क, वस्तू महागल्या. तीन वर्षांपूर्वी शाळेच्या मुलांची स्कूलबॅग एकशे पन्नास रुपयांना होती, यंदा ती तीनशे ते चारशे रुपयांना विकत घ्यावी लागते. मजुरीचा दर वाढला आहे. दुसरीकडे शेतकर्यांच्या मालाला मात्र हमीभाव मिळत नाही, हे दुर्दैव आहे.