माझे बाबा…

सर्वात प्रथम पितृदिन १९ जून १९१० रोजी ‘सोनोरा स्मार्ट डॉड्ड’ यांनी साजरा केला होता. पितृदिन जून महिन्याच्या तिसर्या रविवारी साजरा केला जातो. भारतात आई-वडिलांविषयी आदर सर्वच मुले ठेवतात. वडील आणि वडिलांसारखे व्यक्तिमत्त्व आणि पितृबंधांचा सन्मान करण्यासाठीचा हा दिवस…
आई आईच असते, हे त्रिकालाबाधित सत्य असले तरी वडील हे वडीलच असतात हेही ब्रह्मसत्य आहे. आयुष्य सर्वांगसुंदर असल्याचा प्रत्यय मला माझ्या वडिलांच्या शिकवणीतून सतत येतो. प्रेम घेण्यापेक्षा ते देण्यात परमानंद आहे. दुसर्यांसाठी करता येईल तेवढे करावे, वाटेतील दगड उचलावा, वेदना देणार्या काट्यांना स्वत:च्या हातांनी दूर करावे, रस्ता झाडावा, आजारी लोकांची शुश्रूषा करावी, रडणार्यांचे अश्रू पुसून त्यांना हसवावे, या सगळ्या गोष्टी नेहमी बाबांकडून मिळत असतात. वडील म्हणजे वडीलच असतात. धैर्याचा, हिमतीचा बुरूज. त्यामुळेच आपण स्वच्छंदपणे घरात आणि घराबाहेर राहू शकतो. डोळ्यांत प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्या महान व्यक्तीला ‘वडील’ म्हटले जाते.
वडील आपल्या मुलांसाठी आणि कुटुंबासाठी रात्रंदिवस कष्ट करतात. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील वडिलांचे महत्त्व अनन्यसाधारण असते. तसे पाहता आपल्या आयुष्यातील प्रत्येक दिवस हा वडिलांमुळेच असतो; परंतु तरीही वडिलांच्या समर्पणाला धन्यवाद म्हणून दरवर्षी जून महिन्याचा तिसरा रविवार हा दिवस पितृदिन अर्थात फादर्स डे म्हणून साजरा केला जातो. आई-वडिलांचं स्थान आपल्या जीवनात अतिशय महत्त्वपूर्ण असते. आपल्या आयुष्यातील पहिले गुरू म्हणजे आई-बाबा. काय चूक, काय बरोबर, याची योग्य शिकवण आपल्याला आई-वडीलच देतात. आई आपल्यावर भरभरून माया व प्रेम करते, तर बाबा मुलांची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी दिवसरात्र कष्ट करतात.
आपल्या मुलांना कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही, याची काळजी घेतात. वडिलांचे अगणित ऋण कितीही व काहीही केलं तरी आपण फेडू शकत नाही. पण चांगल्या वर्तनानं, तसंच आयुष्यात काहीतरी मोठं काम करून आपण त्यांना आनंदी नक्कीच ठेवू शकतो. सर्वात प्रथम पितृदिन १९ जून १९१० रोजी ‘सोनोरा स्मार्ट डॉ’ यांनी साजरा केला होता. पितृदिन जून महिन्याच्या तिसर्या रविवारी साजरा केला जातो. पितृदिन जगभरात साजरा करतात. वडील आणि वडिलांसारखे व्यक्तिमत्त्व आणि पितृबंधांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मुले आपल्या वडिलांवर प्रेम दर्शवितात आणि त्यांना कार्ड्स वा पत्र लिहून भेटवस्तू देऊन पितृदिन साजरा करतात. मित्रांनो, आपल्या सर्वांच्या जीवनात आपल्याला घडविण्यात वडिलांचा खूप मोठा हात असतो. आपले वडीलच आपल्याला लहानपणी आपला हात धरून चालायला शिकवितात.
वडिलांचे छत्र
१) जोपर्यंत वडिलांची छाया आपल्यावर असते, तोपर्यंत संकट, अडचणी आपल्या आजूबाजूलादेखील फिरकत नसतात.
२) स्वतःचे अस्तित्व विसरून जाऊन आपल्या सुख आणि आनंदाकरिता कष्ट करतो ती एकमेव व्यक्ती म्हणजे आपले वडील.
३) वेळप्रसंगी आपले तोंडभरून कौतुक करतात आणि वेळ आलीच तर रागावून आपल्याला धाकातदेखील ठेवतात, ते म्हणजे आपले बाबा.
४) कसाही असो, पण बाप शेवटी बाप असतो. आज ज्यांच्या आयुष्यात त्याची छाया नाही त्यांनाच कळते बाप म्हणजे काय असतो.
५) आपल्याला सर्व सुखसुविधा प्राप्त करून देण्यासाठी दिवसरात्र घाम गाळतो तो म्हणजे आपला बाप. माझे बाबा…
जसजसे आपण मोठे होत जातो, आपल्याला जगायला, वागायलादेखील तेच शिकवितात. स्वतःच्या इच्छा मारून आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात. आपल्याला जीवनात सर्व सुखसुविधा प्राप्त व्हाव्यात, आपण उच्च शिक्षण घेऊन चांगला नावलौकिक मिळवावा, म्हणून पैसा कमविण्यासाठी दिवसरात्र आपल्यासाठी ते घाम गाळत असतात. अशा या आपल्या खर्या आयुष्यातील हीरोला सन्मानित करण्यासाठी, त्यांचे आभार मानण्यासाठी, त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक विशेष दिवस दरवर्षी साजरा करण्यात येऊ लागला. तो दिवस म्हणजे फादर्स डे. फादर्स डे हा आपल्याला लहानाचे मोठे करणार्या, आपले लालनपालन करणार्या आपल्या वडिलांना समर्पित करण्यात आलेला एक विशेष दिवस आहे.
तसे पाहायला गेले तर हा एक पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रकार आहे, पण यातून आपल्याला खूप काही चांगले शिकता येते आणि चांगला बोधदेखील मिळतो. आपले वडील हे दिवसरात्र मेहनत करतात, कष्ट करतात आणि आपले संगोपन करीत असतात. आपल्याला लहानाचे मोठे करतात. आपल्याला जे हवे ते आणून देतात. आपले सर्व हट्ट पुरवितात, पण कुठेतरी आपल्याला त्यांच्या याच आपल्यासाठी केलेल्या बलिदानाचा, त्यागाचा विसर पडून जातो. म्हणून आपल्या वडिलांचे आभार व्यक्त करण्यासाठी, त्यांना सन्मानित करून त्यांनी आपल्यासाठी केलेल्या बलिदानाची दखल घेण्यासाठी आपण दरवर्षी हा दिवस साजरा करीत असतो.
विजय कुलकर्णी