दिल्लीत हालचालींना वेग; भाजपच्या ‘या’ प्रमुख नेत्याने बोलवली तातडीने बैठक

नवी दिल्ली : सध्या शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे हे २१ आमदारांसह नॉट रिचेबल असल्याच स्पष्ट झालं आहे. यामध्ये राज्यातील राजकीय घडामोडींकडे आता सर्व देशाचं लक्ष लागलं असून महाविकास आघाडीचं सरकार अल्पमतात येणार की काय? असा प्रश्न देखील उपस्थित होत आहे. तर दुसरीकडे दिल्लीमध्ये देखील मोठ्या हालचाली सुरु असून केंद्रीय मंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बैठक बोलावली आहे. तसंच महाराष्ट्रातूनही देवेंद्र फडणवीस देखील दिल्लीत पोहचले असल्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे.
तर दिल्लीतील बैठक ही महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर घेण्यात येत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर आता भाजपाचे महत्त्वाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे आता दिल्लीत नक्की काय राजकीय डाव खेळले जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याच पार्श्वभूमीवर लवकरच महाराष्ट्रात मोठी राजकीय घडामोड होण्याची शक्यता दर्शवली जातं आहे.
दरम्यान, नुकतंच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, शाब्बास एकनाथजी योग्य वेळी योग्य निर्णय घेतलास, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता… यांच्या या ट्विटमुळे राजकीय वातावरण चांगलंच ठवळून निघालं आहे. राणेंच्या या ट्विटमुळे राणे असं का म्हणाले याबाबत चर्चा सुरु झाली आहे.