काँग्रेसचे आमदार नॉट रिचेबल झालेत का?; बाळासाहेब थोरातांनी केलं स्पष्ट!
![काँग्रेसचे आमदार नॉट रिचेबल झालेत का?; बाळासाहेब थोरातांनी केलं स्पष्ट! uddhav thackerey 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/uddhav-thackerey--1-780x470.jpg)
मुंबई : विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागताच शिवसेनेत सुरु झालेल्या राजकीय घडामोडीनंतर आता काँग्रेसही सावध झाली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसबद्दल चाललेल्या चर्चेला उत्तर दिल आहे. काँग्रेसच्या देखील काही आमदारांचे संपर्क होत नसल्याचा चर्चा सुरु होती. परंतु बाळासाहेब थोरात यांनी आमचे सर्व आमदार आमच्या संपर्कात असल्याचं म्हटलं आहे.
तसंच थोरात यांनी स्पष्ट केलं आहे की, आमचे १० आमदार व काही मंत्री आपापल्या मतदारसंघातून मुंबईला निघाले असून ते लवकरच मुंबईला पोहचतील याचबरोबर आज सकाळी राज्यात सुरु असलेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीबद्दल मंत्री थोरात यांच्या रॉयलस्टोन या शासकीय बंगल्यावर काही आमदारांची आणि मंत्र्यांची बैठक असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
दरम्यान, या बैठकीत राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री विश्वजित कदम, आदी मंत्र्यांसह ३० आमदार उपस्थित असल्याचं देखील थोरात यांनी सांगितलं. तसंच काँग्रेसचे राज्याचे प्रभारी एच.के. पाटील हे देखील सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय परिस्थतीचा आढावा घेण्यासाठी रात्री मुंबईत दाखल होणार आहेत असं थोरात म्हणाले.