मराठमोळा सुपरस्टार सिद्धार्थ जाधवचा पत्नीसोबत घटस्फोट?
![मराठमोळा सुपरस्टार सिद्धार्थ जाधवचा पत्नीसोबत घटस्फोट? siddhart jadhav and trupti](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/06/siddhart-jadhav-and-trupti-780x470.jpg)
मुंबई | Siddharth Jadhav Divorces His Wife – मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ जाधव हा प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो नेहमी त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. तसंच तो आता एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सिद्धार्थ आणि त्याची पत्नी तृप्ती यांची जोडी ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण यावेळी सिद्धार्थ आणि तृप्ती विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तृप्तीने सोशल मीडियावर केलेल्या बदलामुळे ही चर्चा सुरु झाली आहे.
तृप्तीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर असलेलं नावं बदलून तृप्ती अक्कलवार असं केलं आहे. तृप्तीने नावामधील जाधव हे आडनाव काढल्यानंतर सिद्धार्थ आणि तृप्तीच्या घटस्फोटाबाबत चर्चा सुरु झाली आहे. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ हा तृप्ती आणि त्याच्या दोन मुलींसोबत ट्रीपला गेला होता. त्यावेळी सिद्धार्थनं केवळ मुलींसोबतचे फोटो शेअर केले होते. त्यामुळे आता सिद्धार्थ आणि तृप्ती विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या दोन वर्षांपासून सिद्धार्थ आणि तृप्ती हे एकत्र राहत नाहीत. मात्र सिद्धार्थ आणि तृप्तीनं त्यांच्या नात्याबाबत अजून कोणतीही माहिती दिलेली नाही. सिद्धार्थ आणि तृप्तीने २००७ मध्ये लग्नगाठ बांधली. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत. सिद्धार्थ आणि तृप्ती झलक दिखला जा या शोमध्ये सहभागी झाले होते. या शोमधील तृप्ती आणि सिद्धार्थच्या केमिस्ट्रीला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.