‘धर्मवीर’ चित्रपट प्रदर्शनात गैरप्रकार! राज ठाकरेंचा ‘हा’ संवाद वगळला

मुंबई- Dharmaveer Marathi Movie : शिवसेनेचे हिंदुत्ववादी आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्ताने प्रविण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट 13 मे ला चित्रपट गृहांत दाखल झाला. काहीच दिवसांत महाराष्ट्रभर लोकप्रिय झालेल्या या चित्रपटात आनंद दिघे यांचा राजकीय जीवनप्रवास दाखविण्यात आलेला आहे. चित्रपट गृहात दाखवल्यानंतर आता हा चित्रपट झी 5 वर दाखवला जात आहे. मात्र मनसेचे सिनेमा विंगचे अध्यक्ष निर्माते अमेया खोपकर यांनी धर्मवीर चित्रपटाच्या प्रदर्शनात राजकारण करण्यात आल्याचा आरोप केला आहे.
चित्रपट गृहात प्रदर्शित करण्यात आलेल्या धर्मवीर चित्रपटात आनंद दिघे आणि राज ठाकरे यांच्यातील संपूर्ण संवाद दाखविण्यात आला होता मात्र झी5 वर प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटातून त्यांच्यातील काही संवाद कट करण्यात आला आहे. असा आरोप अमेया खोपकर यांनी ट्विट करून केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये राज ठाकरे आणि आनंद दिघे यांचा संवादही दाखवला आहे. त्यामुळं मनसे कार्यकर्त्यांकडून निषेध करण्यात येत आहे.
‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटात आनंद दिघे यांची भूमिका प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी पार पाडलेली आहे. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 30 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे. मात्र राज ठाकरेंच्या डायलॉग वगळण्याच्या आरोपानंतर या चित्रपटाला शिवसेनेने सेन्सॉरशिप दिली असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे.