भारतीय डॉक्टर्स डेच्यानिमित्ताने!!
सरकारी आणि गैर-सरकारी आरोग्य सेवा संस्था अनेक वर्षांपासून डॉक्टरांच्या योगदानाची दखल घेण्यासाठी राष्ट्रीय डॉक्टरदिन साजरा करीत आहेत. हा दिवस साजरा करण्यासाठी आरोग्य सेवा संस्थांद्वारे अनेक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित केले जातात. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टरांचे योगदान सध्याच्या परिस्थितीत फार मोठे आहे, तर काही ठिकाणी डॉक्टरांकडून फ्री मेडिकल कॅम्प भरवले जातात. जेणेकरून एखाद्या आजाराबद्दल त्यांना मोफत उपचारासह जनजागृती डॉक्टरांकडून केली जाते.
डॉक्टरांचे आपल्या आयुष्यातील महत्त्व हे सगळ्यांना माहीत आहे. त्यांचा सन्मान म्हणून किंवा त्यांच्या कार्याला सलाम म्हणून प्रत्येक देशात हा त्या त्या देशाचा राष्ट्रीय डॉक्टर दिवस असतो. आपल्या भारतातसुद्धा एक जुलैला राष्ट्रीय डॉक्टर डे हा साजरा केला जातो. आपल्याला माहीत आहे का, एक जुलै ही तारीख भारतात राष्ट्रीय डॉक्टर डे म्हणून का निवडण्यात आली, त्याबद्दल मी थोडीशी माहिती तुम्हाला सांगणार आहे. कोलकातामधील सन्मानित चिकित्सक आणि पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म (१८८२) आणि निधन (१९६२) मध्ये १ जुलै रोजीच झाले होते.
त्यामुळे त्यांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी १ जुलै रोजी राष्ट्रीय डॉक्टर्स डे साजरा केला जातो. डॉक्टरला देवाचं रूप मानलं जातं. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाईकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला देवदूत असते. अमूल्य सेवेसाठी डॉक्टरांचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. चला, तर मग थोडासा डॉक्टर बिधानचंद्र रॉय यांच्याबद्दल जाणून घेऊया. डॉ. बिधानचंद्र रॉय यांचे योगदान ओळखले जावे, या उद्देशाने भारत सरकारने १९९१ मध्ये डॉक्टरदिन साजरा करण्यासंदर्भातील निर्णय घेतला… मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया आणि इंडियन मेडिकल असोसिएशनच्या स्थापनेत डॉ. बिधानचंद्र रॉय यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. या देशाच्या प्रगतीमध्ये डॉक्टरांच्या भूमिकेला अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
डॉ. रॉय हे वैद्यकीय क्षेत्रात मोठे योगदान देणारे एक महान डॉक्टर होते. डॉ. बिधानचंद्र रॉय यांचा जन्म १ जुलै १८८२ ला बिहारमध्ये झाला होता. डॉक्टर होण्याचा त्यांचा ध्यास हा अचंबित करणारा होता. इंग्लंडच्या सेंट बार्थोलोम्यूस रुग्णालयात दाखल होण्यासाठीचा त्यांचा अर्ज ३० वेळा फेटाळण्यात आला होता. तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपली वैद्यकीय पदवी कोलकात्त्याहून घेतली, तर एमआरसीपी आणि एफआरसीएस पदव्या या इंग्लंडहून मिळवल्या होत्या. १९११ मध्ये त्यांनी आपली प्रॅक्टिस सुरू केली. त्यानंतर त्यांनी कोलकात्ता वैद्यकीय महाविद्यालयात काम करणे सुरू केले.