मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आम्हाला कामाख्यादेवीने आशिर्वाद रुपी काय दिलं तुम्हाला माहिती आहे ना?”

पंढरपूर : (CM Eknath Shinde On Pandhrpur Speech) रविवार दि. १० रोजी आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पंढरपूरच्या विठ्ठल पुजेला गेले होते. हा पुजेचा कार्यक्रम आटपल्यावर शिंदे गटाचा पहिला मेळावा पढरपूर येथे पार पडला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी बोलत होते. आपल्याच माणसाने आपल्यावर वार केले अशी खंत व्यक्त करत ते म्हणाले, मी शिवसैनिकांवर अन्याय होऊ देणार नाही, मीही शिवसैनिक म्हणून काम करेल, आणि मी सध्या मुख्यमंत्री असलो तरी मी जनतेचा सेवक आहे.
दरम्यान शिंदे म्हणाले, बाळासाहेबांचे विचार घेऊन आम्ही सर्व आमदार पुढे जात आहोत. बाळासाहेबांचे आणि दिघे साहेबांचे विचार आम्ही पुढे नेत आहोत. दिघे साहेबांचे शब्द आजही माझ्या कानात घुमतात आहेत. माझ्यावर टीका झाली, खालच्या पातळीवर बोललं गेलं. तरीही आम्ही त्यांच्यावर टीका करणार नाही महाराष्ट्राचा विकास करून त्यांना उत्तर देणार आहोत असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे.
काही लोक आम्हाला म्हणाले, कामाख्यादेवीसाठी आम्ही रेडे पाठवले आहेत पंरतू कामाख्यादेवीने आम्हाला आशिर्वाद रुपी काय दिलं तुम्हाला दिसलंच असेल. मी कधीही कुणावर टीका करत नाही. मी काम जास्त करतो पण कमी बोलतो हे सर्वांना माहिती आहे. आम्ही केलेलं बंड हे ऐतिहासिक आहे. याची जगाने दखल घेतली आहे. असं प्रेम खूप कमी लोकांना मिळतं ते मला मिळालं असं ते म्हणाले.