पुणेलेख

ग्रंथ माझे खरे गुरू

गोडबोले अरुण | (ज्येष्ठ कर सल्लागार, चित्रपट निर्माते आणि साहित्यिक)

गुरु पौर्णिमा म्हणजे आपल्या गुरूला वंदन करण्याचा दिवस. आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला ज्या गोष्टी करता येत नाहीत हे समजावण्यासाठी शिकवण्यासाठी आपल्याला एक गुरूची आवश्यकता असते. अगदी मुळाक्षरे गिरवण्यापासून ते आपले पुढील शिक्षण देण्यापर्यंत तसेच छंदामध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी देखील गुरूची आवश्यकता असते. याला आपण ऐहिक गुरू किंवा व्यावसायिक गुरू असे म्हणू शकतो. गुरू हा प्रत्येकाला करावाच लागतो, कारण माणसाला स्वयंभू ज्ञान काही जन्मजात शक्य नसते. ज्ञानग्रहण करण्याची शक्ती असते आणि ते ज्ञान मिळवण्याची गरज असते. यशस्वी व्यक्तीने ज्ञानग्रहण केले आहे आणि त्याच्या मागे गुरू आहे हे त्याच्या कौशल्यातूनच दिसून येते.

आपण जी साधना करतो त्या साधनेमध्ये अहंकार असू नये हे समजण्यासाठी याचे आकलन होण्यासाठी एका गुरूची आवश्यकता असते. अहंकार हा परमार्थ मार्गाचा एक सर्वात मोठा शत्रू आहे. परमार्थ मार्गात मी मोक्षाला जाईन हा अहंकार लोप पावण्यासाठी कुठेतरी मार्गदर्शन आवश्यक असते. असे म्हणतात दत्तात्रयांनी 24 गुरू केले. लहान किडा, मुंगीपासून आयुष्यात काहीतरी शिकले. तसेच आपण आपल्या आयुष्यात पारमार्थिक गुरू करत असतो.

मी कोणाला गुरू केले असे नाही. ग्रंथ हेच मी माझे गुरू मानले. म्हणून मला असं वाटतं समर्थांचा दासबोध असेल, मनाचे श्लोक असतील, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम महाराजांची गाथा असेल या प्रत्येकातून आपल्याला काहीतरी नवीन शिकायला मिळते. यामुळे आपण आपले जे षडरिपू आहेत त्यावर हळूहळू विजय प्राप्त करू शकतो. असा विजय मिळवून आपण योगी किंवा सिद्ध गुरू होऊ असे काही शक्य नसते. परंतु साधना केल्याने आपली हळूहळू प्रगती होत जाते.

आयुष्यात येणाऱ्या बऱ्या वाईट घटनांचा आपल्या मनावर कमीत कमी परिणाम होऊ शकतो. प्रपंच आणि परमार्थ या एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका या समर्थ रामदासांच्या ओवीनुसार प्रपंच नेटका होण्यासाठी गुरूचे मार्गदर्शन गरजेचे आहे. तसेच परमार्थ मार्गी लागल्यावर सुद्धा गुरू करून त्याकडून उपदेश घ्यावा. आताच्या काळात आपण गुरू करून त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला तर ते धोक्याचे ठरू शकते.

कारण वाढती बुवाबाजी याला कारणीभूत आहे. गंडे, दोरे देणारे जे गुरू असतात ते गुरू खरे नव्हेत. त्यामुळे सध्याच्या काळात असे वाटते की, चांगल्या संतांचे विचार, ग्रंथ त्यातील विचार अवलंबणे, त्यांचे चिंतन व मनन करणे आणि ते विचार प्रत्यक्षात उतरवणे हाच गुरुपदेश खरा आहे. त्या दृष्टीने ज्या ज्या लोकांनी मला आयुष्यामध्ये मार्गदर्शन दिलं ज्यात लेखन असेल माझी इन्कमटॅक्स प्रॅक्टिस असेल, चित्रपटाची निर्मिती असेल त्या क्षेत्रातील माझे गुरू आणि ज्या ग्रंथांचा मला उपयोग झाला त्यामुळे हे ग्रंथ माझे खरे गुरू आहेत असे मला वाटतं.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये