“शिवसेनेत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे असा कोणताही गट नाही”- सेना खासदार

बुलढाणा : (Shivsene’s Not Group Uddhav Thackeray And Eknath Shinde) शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली सेनेच्या 40 आमदारांनी बंड पुकारलं. त्यानंतर काही दिवसांपुर्वी सेनेच्या 12 खासदारांनीही बंडखोरी केली. त्यातील एक नाव बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधव हे देखील एकनाथ शिंदे गटात सामील झालेत. यानंतर ते शनिवार दि. 23 रोजी पहिल्यांदाच बुलडाण्यात आले. यावेळी ते बंडखोर शिंदे गटात का गेले यावर त्यांनी प्रतिक्रिया दिलीय. शिवसेना महाविकास आघाडी सरकारमध्ये सामील झाल्याने हिंदुत्वापासून दूर जात होती असं सर्वसामान्यांनाही वाटू लागलं होतं. त्यामुळेच आम्ही भाजपासोबत नैसर्गिक युती केली, असं मत प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केलं. ते बुलडाण्यात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बोलत होते.
शिवसेनेत उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे असा कोणताही गट नाही. आम्ही शिवसेना पक्षातच आहोत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारावर, आनंद दिघे यांच्या शिकवणीखाली शिवसेनेची वाटचाल करतो आहे. मागील अडीच वर्षा काँग्रेस राष्ट्रवादीसोबत गेल्यामुळे हिंदुत्वाच्या अनेक मुद्द्यांना बाजूला ठेवावं लागलं होतं, असं प्रतापराव जाधव म्हणाले.
शिवसेना हिंदुत्वापासून दूर जाते की काय, असं सर्वसामान्य लोकांना वाटायला लागलं होतं. त्यामुळेच हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा घेऊन भाजपसोबत नैसर्गिक युती केली. आम्ही निवडणुकीत शिवसेना-भाजप युती म्हणून लढलो. तीच नैसर्गिक युती आज झाली. त्या युतीचे पाईक म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती म्हणजे शिवसेना भाजप युती सत्तेत आली आहे, असंही प्रतापराव जाधव यांनी सांगितलं.