जीएसटीमुळे दुग्धजन्य पदार्थांची दरवाढ

सामान्यांच्या खिशाला बसणार आणखी कात्री
पुणे : दही, ताक, लस्सी या दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीवर पाच टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचा परिणाम म्हणून दही, ताक आणि लस्सीच्या विक्री दरात सरासरी पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे. अमूल आणि चितळे डेअरी यांनी दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत पाच टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा परिणाम म्हणून सामान्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे, असे गोवर्धन डेअरीचे प्रीतम शहा आणि प्रकाश कुतवळ यांनी सांगितले.
नुकताच अन्नधान्यासह काही जीवनावश्यक वस्तूंवर ५ टक्के जीएसटी लावण्याच्या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी देशव्यापी लाक्षणिक बंद केला. पॅकिंंग केलेल्या अनब्रँडेड अन्नधान्यासह काही वस्तूंवर जीएसटी विरोधात व्यापारी संघटनांच्या बंदमुळे महत्त्वाच्या बाजारपेठांवर खूप परिणाम झाला. पण जीएसटी वाढ कायम राहिली. हंगाम नसल्यामुळे लस्सीला फारशी मागणी नसल्यामुळे विक्री दरात वाढ करणे टाळले आहे.
पाच टक्के जीएसटी आकारण्यामुळे दरवाढ करून ग्राहकांवर लगेच आर्थिक बोजा टाकण्याची गरज नाही. दही, ताकाच्या विक्रीवर कर नसल्यामुळे कर परताव्याचा फायदा घेता येत नव्हता. आता उत्पादनाच्या अंतिम विक्रीवर कर असल्यामुळे वेष्टनाचा कच्च्या मालासाठी द्यावा लागलेला जीएसटी कर परताव्याने मिळणार आहे. त्यामुळे पाच टक्के जीएसटीचा खूप मोठा फटका बसेल, असे चित्र नाही. आता पावसाळा सुरू झाला आहे. पुढील महिन्याभरात दूध संकलनात वाढ झाल्यानंतर दूध खरेदीदर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही सध्या तरी कोणतीही वाढ करणार नाही.
— संजय कालेकर, प्रभारी व्यवस्थापकीय संचालक , कात्रज डेअरी
अमूलने एक किलो दह्याच्या पिशवीमागे चार रुपयांची वाढ केली आहे. यामुळे ७० प्रति किलो मिळणा दही आता ७४ रुपये प्रति किलोवर गेले आहे. ताक ३० रुपये लीटर होते, त्यात दोन रुपयांची वाढ होऊन ते ३२ रुपयांवर गेले आहे. अशीच दही, ताकाच्या विक्रीत सरासरी पाच टक्क्यांची वाढ चितळे समूहाने केली आहे. दरम्यान जीएसटी परिषदेच्या या निर्णयामुळे अन्नधान्य आणि दुग्धजन्य पदार्थ महागल्याने ८ ते १० टक्के दरवाढीचा बोजा ग्राहकांवर पडणार आहे.