“मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्यानं मुख्यमंत्र्यांवर कामाचा भार वाढला आणि ते आजारी पडले”
!["मंत्रिमंडळाचा विस्तार नसल्यानं मुख्यमंत्र्यांवर कामाचा भार वाढला आणि ते आजारी पडले" eknath shinde 5](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/eknath-shinde-5-780x470.jpg)
मुंबई – Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांपासून आजारी पडलेले आहेत. ‘मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यापासून ते सतत काम करत आहेत. त्यांना आराम करण्यासाठी वेळ मिळत नाही. ते दिवसभरात दोन ते तीन तासंच झोप घेऊ शकतात त्यामुळे ते आजारी पडले.’ असं शिंदे गटातील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आजारी पडण्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मिश्किल टोला लगावला आहे. शिंदे सरकार स्थापन होऊन महिन्यापेक्षा जास्त दिवस झाले तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. प्रत्येक दिवशी सरकारकडून मंत्रिमंडळ विस्ताराबाबत नवीन तारीख सांगितली जाते. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत त्यावरून अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार झालेला असता तर मुख्यमंत्री आजारी पडलेच नसते अशी मिश्कील टीका केली आहे.
अजित पवार म्हणाले, ‘आज एक महिना उलटून गेला आहे तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघेच राज्याचा करभार सांभाळत आहेत. आता त्यांच्यावर इतका भार आला आहे की, मुख्यमंत्री आजारी पडत आहेत. मी चांगल्या भावनेनं बोलतोय. आजारी कुणीच पडू नये. पण मंत्रिमंडळाचा तोच भार ४०-४२ लोकांचं मंत्रिमंडळ असतं तर कामाची वाटणी झाली असती.’ अशी टीका राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दिरंगाईवर अजित पवारांनी दिली.