सर्पदंशावर आता ‘डेडिकेटेड’ केंद्र
![सर्पदंशावर आता ‘डेडिकेटेड’ केंद्र City News](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/City-News--780x470.jpg)
डॉ. सदानंद राऊत आणि डॉ. पल्लवी राऊत यांची प्रकट मुलाखत
पुणे : ‘सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूची राजधानी मानल्या गेलेल्या भारतात अलीकडील काळात सर्पदंश या विषयावर जागरूकता वाढली आहे. ‘शून्य सर्पदंश मृत्यू’ या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही प्रबोधन, प्रशिक्षण आणि उपचार या घटकांवर भर देत आहोत. त्याचबरोबर आगामी काळात सर्पदंशपीडितांना तातडीने आणि योग्य उपचार मिळावे, यासाठी सर्पदंश उपचाराचे ‘डेडिकेटेड’ केंद्र उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहे,’ अशी माहिती डॉ. सदानंद राऊत यांनी दिली.
पी. एम. शहा फाउंडेशन आणि वर्धमान प्रतिष्ठान, शिवाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सामान्य ते असामान्य’ या कार्यक्रमात डॉ. सदानंद राऊत आणि त्यांच्या पत्नी डॉ. पल्लवी राऊत या दाम्पत्याची प्रकट मुलाखत घेण्यात आली. डॉ. राऊत यांनी ५५०० पेक्षा अधिक सर्पदंशपीडितांवर उपचार करत त्यांचे प्राण वाचविले आहेत. तसेच विविध शिबिरांच्या माध्यमातून २५,००० हून अधिक रुग्णांची आरोग्य तपासणी केली आहे.
भारतात सर्पदंश विषयावर जनजागृती करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. सर्पदंश उपचाराबाबतच्या सद्यःस्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेकडून सर्पदंशामुळे होणारे मृत्यू हा विषय अतिशय गांभीर्याने घेण्यात आला असून, त्यावर योग्य उपाययोजना करण्यासाठी विविध प्रकल्प राबविले जात आहेत.
सर्पदंशावरील उपचारासाठी आवश्यक असलेल्या लशींबाबत राष्ट्रीय प्रोटोकॉल ठरविण्यात आले आहे. ग्रामीण भागात वैद्यकीय उपचारासाठी आजही प्रशिक्षित डॉक्टर आणि कर्मचारी यांची मोठी कमतरता जाणवते. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या तरुणांनी ग्रामीण भागात जाऊन कार्य करावे.