मिशन बारामतीला गती
![मिशन बारामतीला गती maha politics](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/08/maha-politics--780x470.jpg)
मुख्यमंत्र्यांचे विजयराव शिवतारे यांना पाठबळ
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सासवड दौरा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा नियोजित दौरा पाहता मिशन बारामती लोकसभा मतदारसंघ मोहिमेला भाजपने गती दिली आहे, असे म्हणता येईल. या मोहिमेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना आपल्या बारामती मतदारसंघात जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. राज्यातील सत्ताबदलानंतर तर राष्ट्रवादीसाठी ही गरज निर्माण झाली आहे.
केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांनी ए फॉर अमेठी आणि बी फॉर बारामती असे सांगून बारामती मिशन पुणे दौऱ्यात सूचित केले होते. अमेठी जिंकले, त्याचप्रमाणे २४ च्या निवडणुकीत बारामती जिंकायचे आहे, असा मतितार्थ इराणी यांच्या वक्तव्याचा होता.
बारामती मतदारसंघात पुरंदर विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. येथील माजी आमदार विजयराव शिवतारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना शिवसेना अंतर्गत राजकारणात साथ दिली आहे. शिंदे यांनीही नुकताच सासवड दौरा करून शिवतारे यांचे राजकीय महत्त्व वाढविले आहे. या घडामोडी राष्ट्रवादीला अस्वस्थ करणाऱ्या आहेत.
पुरंदरमधून काँग्रेस पक्षाचे संजय जगताप शिवतारे यांना पराभूत करून २०१९ च्या निवडणुकीत विधानसभेवर निवडून आले.त्यावेळी पवार कुटुंबीयांनी पुरंदर आणि भोरमधून खासदार सुळे यांना मताधिक्य मिळावे, याकरिता जगताप आणि संग्राम थोपटे यांच्याशी राजकीय तडजोड करीत शिवतारे यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पाठबळाचा परिणाम जगताप यांच्यासह सुप्रिया सुळे यांच्या आगामी राजकारणावर परिणाम करणारा आहे, असे दिसते. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचाही दौरा बारामती मतदारसंघात होत आहे.भारतीय जनता पक्ष त्यांच्या आखणीनुसार केंद्रीयमंत्री, नेते यांचे दौरे बारामती भागात वाढवत नेतील. राज्यातील एका नेत्यावर मतदारसंघाची जबाबदारी सोपविली जाईल.