ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबईरणधुमाळी

“हनुमान चालीसा म्हणण्यावरून जेल मध्ये राहणाऱ्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान आहे”

अमरावती : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून अनेक हिंदू सणांसंबंधित मोठे निर्णय त्यांनी घेतले आहेत. दहीहंडीसंबंधित देखील ऐतिहासिक निर्णय शिंदे सरकारकडून घेण्यात आले आहेत. त्यामुळे राज्यातील तरुणाई मोठ्या प्रमाणात आनंदात असल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी दहीहंडीचे कार्यक्रम मोठ्या जल्लोषात यावर्षी साजरे झाले आहेत. दरम्यान, आज (२१ ऑगस्ट) युवा स्वाभिमानी पक्षातर्फे अमरावतीत दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दहीहंडीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालीसावरून महाविकास आघाडी सरकारवर निशाना साधला आहे.

आपल्या भाषणात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी हनुमान चालीसा वरून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “आता आपले सरकार असून हनुमान चालीसा म्हणण्यावरून कोणालाही तुरुंगात जावे लागणार नाही. हनुमान चालीसा म्हणण्यावरून १४ दिवस कारागृहात राहणाऱ्या राणा दाम्पत्याचा मला अभिमान आहे.” असा ठाकरे सरकारवर टोला लगावत राणा दाम्पत्याचं कौतुकही त्यांनी केलं आहे.

“मागील दोन वर्षे आपण कोरोनामुळे घरी होतो. मात्र, आता आपलं सरकार आहे. दहीहंडी, नवरात्रोत्सव, दसरा, शिवजयंती हे त्याच उत्साहात आणि जल्लोषात साजरे होतील. मी रवी राणा आणि नवनीत राणा यांचं अभिनंदन करतो. ज्या काळात राज्यात हनुमान चालीसा म्हणणे कठीण होते त्या काळात या दोघांनी चालीसा म्हणण्याची हिंमत दाखवली. म्हणून त्या दोघांचाही मला अभिमान आहे.” अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये