“मर्दानगी असेल तर समोर या आणि…”, बच्चू कडूंचं विरोधकांना आव्हान!

मुंबई | Bacchu Kadu On Opponents – पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये घोषणाबाजीचा कलगीतुरा चांगलाच रंगला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. एकीकडे विरोधकांनी ‘५० खोके, एकदम ओके’च्या घोषणा देत सत्ताधाऱ्यांना डिवचलं, तर सत्ताधाऱ्यांनीही ‘आदित्य ठाकरेंची ‘दिशा’ चुकली’, ‘लवासाचे खोके, बारामती ओके’ अशा प्रकारच्या घोषणा देत विरोधकांना लक्ष्य केलं. यासंदर्भात आता दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षातील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.
विधानभवनात अमोल मिटकरी आणि महेश शिंदे यांच्यात झालेल्या बाचाबाचीवरून बच्चू कडूंनी खोचक शब्दांत टीका केली आहे. यावेळी बच्चू कडू म्हणाले, “मला तर वाटतं की काही लोक सभागृहात काहीच बोलत नाहीत आणि पायरीवर येऊन जोरजोरात बोंबलतात. पायऱ्यांवर कुणी बोललं आणि बॅनर छापले की त्याची ब्रेकिंग होते”.
“५० खोके, एकदम ओके वगैरे घोषणा त्यांनी केल्या. तुम्हाला जर ५० खोके दिले असं वाटत असेल, तर कारवाई करा. असं नामर्दांसारखं वक्तव्य का करत आहात? मर्दानगी असेल, तर समोर या आणि पुरावे द्या”, असं आव्हान बच्चू कडूंनी विरोधकांना दिलं आहे.