“शेवटी सुप्रिया सुळेंचं काम बोलतं…”, चंद्रशेखर बावनकुळेंच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं प्रत्युत्तर

मुंबई | Amol Kolhe On Chandrashekhar Bawankule Statement On Supriya Sule – सध्या देशात 2024 च्या लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘मिशन बारामती’ला सुरूवात झाली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 22, 23 आणि 24 सप्टेंबरला बारामतीमध्ये येणार आहेत. या दौऱ्याची पुर्वतयारी करण्यासाठी भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी आज (6 सप्टेंबर) बारामतीत बैठक घेतली. यावेळी त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला. 2024 ला आम्ही बारामती जिंकणार आहोत, सुप्रिया सुळे यांनी दुसरं ‘वायनाड’ शोधावं असं विधान बावनकुळे यांनी केलं आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. बावनकुळेंच्या विधानाबाबत विचारलं असता अमोल कोल्हे म्हणाले, “सुप्रिया सुळे ह्या आमच्या पक्षाच्या लोकसभेतील नेत्या आहेत. संसदेतील सदस्यांना ‘संसदरत्न’ पुरस्कार दिला जातो, सुप्रिया सुळेंना ‘महासंसदरत्न’ पुरस्कार मिळाला आहे. त्यांची कामगिरी आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणारी आहे.”
“शेवटी त्यांचं काम बोलतं, इतर कुणी काहीही बोललं तरी याने फारसा फरक पडत नाही. जनता सुज्ञ आहे. जनतेनं सातत्याने सुप्रिया सुळेंवर विश्वास दाखवला आहे. हाच विश्वास जनता पुढेही 101 टक्के कायम ठेवेल, असा मला विश्वास आहे. त्यामुळे सध्या कोणी काही बोलत असेल तर अजून बरंच पाणी पुलाखालून वाहून जायचं आहे, असंही अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते ‘टीव्ही 9 मराठी’ वृतवाहिनीशी संवाद साधत होते.