क्रीडाताज्या बातम्या

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा: नेमबाजीत रुद्रांशचा सुवर्णवेध

३६ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रग्बीमध्ये पुरुष व महिला संघाला रौप्य

अहमदाबाद : महाराष्ट्राचा ज्युनियर विश्वविजेता नेमबाज रुद्रांश पाटीलने पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये अचूक नेम साधून सुवर्णपदकाची कमाई करीत आपल्या संघाला ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पहिले सुवर्णपदक जिंकून दिले. रग्बी क्रीडा प्रकारात महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ज्युुनियर वर्ल्ड चॅम्पियन नेमबाज रुद्रांश पाटीलने शुक्रवारी सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषाच्या दहा मीटर एअर रायफल गटामध्ये चॅम्पियन होण्याचा बहुमान पटकावला. यासह त्याने महाराष्ट्र संघाला सुवर्णपदकाचे खाते उघडून दिले. ठाण्याच्या आंतरराष्ट्रीय नेमबाज रुद्रांशने फायनलमध्ये अचूक नेम साधत १७ गुणांची कमाई केली. रुद्रांश पात्रता फेरीमध्ये सर्वोत्तम कामगिरी सादर फायनल गाठली होती.
रग्बी स्पर्धेत महाराष्ट्र संघास दोन रौप्यपदके

महाराष्ट्राच्या पुरुष व महिला रग्बी संघांनी रौप्यपदकाची कमाई केली. दोन्ही गटांच्या अंतिम फेरीत महाराष्ट्र संघांना पराभूत व्हावे लागले. पुरुष गटात हरयाणा संघाने महाराष्ट्र संघास नमवत सुवर्णपदक जिंकले. महाराष्ट्र संघ रौप्यपदकाचा मानकरी ठरला. दिल्ली संघाने पश्चिम बंगालला नमवून कांस्यपदक संपादन केले. महिला गटात अंतिम फेरीत ओडिशा संघाने महाराष्ट्र संघास पराभूत करुन सुवर्णपदक पटकाविले. पहिल्या हाफमध्ये उभय संघांतील खेळाडूंचा खेळ तुल्यबळ झाला. दुसऱ्या हाफमध्ये मात्र ओडिशा संघाने महाराष्ट्र संघावर दबाव वाढवत सामना जिंकत सुवर्णपदक जिंकले. बिहार संघ कांस्य
पदकाचा मानकरी ठरला. दिल्ली संघ चौथ्या स्थानावर राहिला.

खो-खो महाराष्ट्र महिला, पुरुष संघांची विजयी सलामी

महाराष्ट्राला खोखो संघांकडून सुवर्णपदकांची अपेक्षा आहे. महाराष्ट्राच्या महिला व पुरुष संघांनी अपेक्षेप्रमाणे विजयी सलामी दिली. पुरुष व महिला गटात महाराष्ट्राने यजमान गुजरात संघाला पराभूत केले. महिला गटात महाराष्ट्र संघाने यजमान गुजरात संघाला एक डाव आणि सहा गुणांनी पराभूत करुन दणदणीत विजयी सलामी दिली. हाफ टाइमला महाराष्ट्र संघ २२-१६ असा आघाडीवर होता. महाराष्ट्र संघातील सर्वच खेळाडूंनी आक्रमक खेळाचे प्रदर्शन करुन सामना गाजवला. आक्रमक डावपेच हे महाराष्ट्र संघाच्या पथ्यावर पडले. प्रियांका भोपी हिने ३.५० मिनीटे पळतीचा खेळ करुन सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. सोमेश सुतारने २.५० मिनीटे पळतीचा सुरेख खेळ केला. प्रियांका इंगळे हिची अष्टपैलू कामगिरी ठरली. प्रियांकाने २.४० मिनीटे पळतीचा खेळ केला आणि आक्रमणात सहा गुण देखील मिळवले. शीतल भोरे व ऋतुजा खरे या दोघींनी प्रत्येकी चार गुण संपादन करुन संघाच्या मोठ्या विजयात मोलाचा वाटा उचलला. संपदा मोरे हिने २.१० मिनीटे पळतीचा खेळ केला. पुरुष गटात महाराष्ट्र संघास गुजरात संघाने चांगलेच झुंजवले. महाराष्ट्र संघाने गुजरात संघाची कडवी झुंज मोडून काढत दोन गुण व सहा मिनीटे राखून सलामीची लढत जिंकत आगेकूच केली. महाराष्ट्र संघाकडून अक्षय भांगरे याने अष्टपैलू खेळ केला. त्याने १.४० मिनीटे पळतीचा खेळ केला. तसेच दोन गुण मिळवले. ह्रषिकेश मुर्चावडे याने १.५० मिनीटे पळतीचा खेळ केला. लक्ष्मण गावस याने १.५० मिनीटे संरक्षण व दोन गुण टिपत अष्टपैलू कामगिरी नोंदवली. अविनाश देसाई याने ८ गुण टिपत शानदार कामगिरी बजावली. सुयश गारगाटे याने २.२० मिनीटे संरक्षण केले व आठ गुण मिळवून देत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रतिक वाईकर याने १.२० मिनीटे पळतीचा खेळ केला व सहा गुण मिळवत सामना गाजवला. रामजी कश्यप याने १.२० मिनीटे संरक्षण केले.

कुस्ती : विक्रमी गुण नोंदवूनही सूरज पराभूत

वेगवान डावपेचांमुळे विक्रमी गुणांच्या लढतीत महाराष्ट्राच्या सूरज आसवलेला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. फ्री स्टाईल प्रकारातील ५७ किलो गटात कर्नाटकच्या प्रशांत गौड याने त्याचा २४-२२ असा दोन गुणांनी पराभव केला. फ्री स्टाईलच्या ९७ किलो गटात महाराष्ट्राच्या पृथ्वीराज पाटील याला पहिल्याच फेरीत सेनादलाच्या नासिरविरुद्ध ६-४ गुणांनी हार मानावी लागले. ग्रीको रोमन प्रकारातील ६७ किलो विभागात महाराष्ट्राच्या विनायक सिद्ध याने मध्यप्रदेशच्या के. यादव याच्यावर ७-३ अशी मात केली. दुसऱ्या फेरीत मात्र हरयाणाच्या अंशू कुमार याने त्याचा ४-० असा पराभव केला. याच विभागातील ८७ किलो गटात महाराष्ट्राच्या शिवाजी पाटील यांनी उत्तर प्रदेशचा मल्ल रामसिंग यादव याला ४-३ असे हरविले. दुसऱ्या फेरीत त्याने हरयाणाच्या सुनील कुमार या अनुभवी मल्लाला चांगली लढत दिली. तथापि ही लढत त्याने ४-९ अशी गमावली.

तलवारबाजी : अनिलचे आव्हान संपुष्टात

तलवारबाजीत सलामीच्या दिवशी महाराष्ट्र संघाचे एकमेव आशास्थान असलेला अनिल महिपतीचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. शनिवारी सेबर व इप्पी या प्रकारात वैयक्तिक प्रकारात महाराष्ट्र संघ पदकांचे खाते उघडेल, असा विश्वास व्यवस्थापनास वाटत आहे. आज वैयक्तिक प्रकाराच्या स्पर्धा झाल्या. त्यात महाराष्ट्राच्या आशा एकमेव अनिल महिपतीच्या कामगिरीवर होत्या. फॉइल प्रकारात अनिल महिपती याने उपउपान्त्यपूर्व फेरीत ओडिशाच्या रवी शर्माचा १५-१३ असा पराभव करुन आगेकूच केली. उपान्त्यपूर्व फेरीत तमिळनाडूच्या विनोद याने अनिल महिपतीला १५-७ असे नमवून त्याची आगेकूच रोखली.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये