वन्यजीवांसाठी अन्नसाखळी हवी

शास्त्रीय माहिती घेऊन निसर्गाशी जोडावे नाते
विठ्ठल वळसेपाटील, पर्यावरण अभ्यासक
‘नवी जीवनात पाळीव प्राणी जितके महत्त्वाचे आहेत. तितकेगभर्यावरण अबाधीत ठेवण्यासाठी जंगली प्राणी महत्वाचे आहे. जंगली प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन होणे अवश्य आहे. हे संवर्धन त्यांच्या योग्य अन्नसाखळी निर्माण करूनच होईल. १ ते ८ आक्टोबरपर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा केला जातो.त्या निमित्त…
सजीवसृष्टी निरंतरासाठी प्राणी जगताविषयी ज्ञान आत्मसात करणे अवश्य आहे. प्राण्याचे कल्याण व्हावे, मानवी जीवनात त्यांचा सदुपयोग व्हावा व धोक्यात आलेल्या प्राण्यांना संरक्षण मिळावे. पशु-पक्षी, प्राणी यांच्या संरक्षणाचे निकष आधुनिक घडामोडींना अनुरूप बनवले पाहिजे.सजीवांबद्दलची ममता व्यक्त करण्यासाठी १९३१ मध्ये पर्यावरण शास्त्रज्ञांच्या परिषदेने जागतिक प्राणी दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला गेला. या दिवशी अनेक देशांत प्राण्यांवर प्रेम करणाऱ्या व त्यांचे संरक्षण करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा सन्मान केला जातो. संत एकनाथ महाराजांनी रामेश्वराच्या कावडीचे पाणी तहानेने व्याकूळ झालेल्या गाढवाला पाजल्याची कथा आजही सांगितली जाते.
हीच खरी भूत दया आहे. याची जाणीव होणे हे संवेदनशील मानवीपणाचे लक्षण आहे. निसर्गप्रेमी मंडळींनी समृद्ध पर्यावरणासाठी देशी पद्धतीची व आयुर्मान जास्त असलेली, खोलवर रुजणारी झाडे लावली पाहिजेत. जंगलातील अनेक वटवृक्ष नष्ट झाले आहेत. तर प्रचंड झाडतोडही मोठ्या प्रमाणात असून यातून अनेक झाडे नष्ट झाली आहेत. त्या ठिकाणी विदेशी झाडे आली आहेत. देशी झाडांची साल, पाने, फुले, फळे, शेंगा, बिया, डिंक, चीक यापासून मनुष्य व वन्यजीवांचे अन्न असते. अन्नसाखळीसाठी देशी झाडांचे फायदे समजावून घेतले पाहिजेत. बहुपयोगी वड हा मोठ्या प्रमाणात प्राणवायू देतो. याचे फळ माकड व इतर पक्षी यांचे अन्न आहे. तसेच वडाची साल, मूळ, पानं व िचकापासून मानवाला १५ फायदे होतात. तसेच रानबाभूळ पाहिली तर ओबडधोबड झाड. परंतु, यापासून बहुउपयोगी डिंक, सालीच्या दातवणासाठी, शेंगांचा हिरड्यांची, सूज कमी करण्यास तर पाल्याच्या चारा म्हणून तसेच उष्णतावर्धक लाकूड इंधन म्हणून उपयोग होतो. तेल व औषधी म्हणून मोठा उपयोग होतो. त्यामुळे अशी समृद्ध वने दीर्घकाळ राहतात.
सुंदर पर्यावरण व समृद्ध जंगल निर्मितीसाठी व अन्नसाखळी व पाणवठेसाठी देशी झाडांचे फायदे समजावून घेतले पाहिजेत. बहुपयोगी वड, पिंपळ, चिंच, फणस, आवळा, आंबा, बेल, कडुनिंब, मोह, कदंब, पळस, लाख, साल, कवठ याशिवाय साधी बाभूळ, हिवर, धावडा, आपटा, भोकर, आवळा, पांगारा, पिपरी, नांदूक, मोह, पारिजातक, शिंदी, करंज, चंदन, कुसुम, बिबवा, खैर, हिंगण, गोधन, रानभेंडी, अर्जुन अशी भारतीय देशी झाडे ही ऑक्सिजन लंग्ज निर्माण करतात. व ती खाद्य म्हणूनही मोठा उपयोग होतो. तसेच करवंदं, तरवड, मुरुडशेंग, निर्गुडी, अश्वगंधा, बोरकर, ही झुडपे तर वेलीत गुंज, शेवरी, कावळी, अनंतमूळ तर फळझाडात रामफळ, अंजीर, सीताफळ, चिक्कू, पेरू, तुती, शेवगा, हादगा, लिम्बुनी, जांभूळ तर गवतात कुसळी गवत, एकदांडी, माकडशिंगी, पसरी गवत, गोधडी हे गवत केवळ खाद्य नव्हे तर चांगल्या प्रमाणात प्राणवायू निर्माण करतात. अनेक काटेरी वनस्पती व फुलझडी यांवर फुलपाखरे, भुंगे, मधमाश्या आपले अस्तित्व टिकून राहतात. त्यामुळे परागी भवन सुरळीत चालू राहते. विदेशी झाडांना फळे व फुले लगडत नाहीत. त्यामुळे पोपट, मैना, साळुंकी, सुतार पक्षी, धीवर, घार, ससाणा, बगळे असे अनेक पक्षी हळूहळू नाहीसे होत आहेत. पोपटांचा थवा हा फक्त मुलांच्या गोष्टीतला व आठवणीतला विषय बनून राहिला आहे. देशी झाडांची मुळे खोलवर जाऊन जमिनीला घट्ट पकडून ठेवणारी आहेत. तसेच कमी पावसावर तग धरून जिवंत राहतात. त्यामुळे जमिनीची धूप कमी होते. याशिवाय बीज मोठ्या प्रमाणावर उत्पन्न होत असल्याने पुनर्रनिर्मिती होते. शास्त्रीय माहिती न घेता निसर्गाशी नाते जोडणे पर्यावरणासाठी व मानवी अस्तित्वासाठी धोक्याचे आहे. अनेकांनी वास्तुनिवास सुशोभीकरणात तुळस वगळता सर्व विदेशी वृक्ष दिसतात, पण ही परदेशी झाडे पर्यावरणास व आरोग्यास घातक असल्याचे संशोधनावरुन सिध्द झाले असल्याचे सांगितले जात आहे.
अनेक प्राणी नष्ट होत असताना भारतात चित्यांचे आगमन झाले. त्यांची वंशवृध्दी होणे आवश्यक आहे.चित्ता जसा नामशेष झाला, तसे इतर प्राणी नामशेष होता कामा नये. वन व वन्यजीव रक्षण करण्याची मोठी वेळ आली आहे. जंगलातील प्राचीन अन्न साखळी निर्माण करावी लागणार आहे. त्यासाठी हिरवा चारा व फळे, फुले, असणारी देशी वृक्ष लागवड अवश्य असून भविष्यात शासनाने या गोष्टी केल्या नाहीतर मानवी वस्तीकडे हिंस्त्र प्राण्यांचे होणारे अतिक्रण रोखणं अवघड होणार आहे. समृद्ध वने उभी करताना अन्नसाखळी टिकली तरच मानवाचा भविष्यकाळ उज्ज्वल राहील.