“ठाकरे आणि शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी”

पिंपरी | Ajit Pawar – एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांसह बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत फुट पडली. त्यानंतर शिंदे गट आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोपांचं सत्र सुरू आहे. तसंच दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे झाले. एकीकडे शिवसेनेचा (Shivsena) शिवाजी पार्कवर (Shivaji Park) तर दुसरीकडे शिंदे गटाचा (Shinde Group) बीकेसी मैदानावर (BKC Ground) दसरा मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. या पार्श्वभूमीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी ठाकरे आणि शिंदे यांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी, असं मत व्यक्त केलं आहे.
महागाई, बेरोजगारीसारखे महत्त्वाचे विषय बाजूला ठेवून भलत्याच विषयांवर चर्चा घडवून आणली जात आहे. शिवसेनेच्या अंतर्गत वादाला अवास्तव प्रसिद्धी दिली जात असून, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनी सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. राजकीय जोडे बाजूला ठेवून सलोख्याच्या भावनेनं राहिलं पाहिजे, असं अजित पवार म्हणाले. ते थेरगाव येथे प्रसार माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यायला हवी. प्रत्येकाला पक्षाची ताकद वाढवण्याचा तसंच पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. मात्र, लोकशाहीच्या परंपरा जपल्या पाहिजेत. सद्य:स्थिती पाहता त्यांच्यातील वाद पराकोटीला गेले आहेत. शब्दाने शब्द वाढला जातो. ‘अरे ला कारे’ झाले, की त्याचे पडसाद दूरपर्यंत पसरतात. राजकारणाच्या वेळी राजकारण ठीक आहे. राजकीय जोडे बाजूला ठेवून सलोख्याच्या भावनेनं राहिलं पाहिजे, असंही अजित पवार म्हणाले.
पुढे ते म्हणाले, ठाकरे आणि शिंदे यांच्यातील वादाल कोणाला कोणतं चिन्ह मिळेल, हे आत्ताच सांगता येत नाही. राष्ट्रवादीला प्रारंभी चरखा हे निवडणूक चिन्ह मिळालं होतं. ऐनवेळी वाद झाला आणि चरखा चिन्ह गोठवण्यात आलं. नंतर, आम्हाला घड्याळ मिळालं. प्रसारमाध्यमांमुळे जग जवळ आलं आहे. त्यामुळे आता कोणतंही चिन्ह असलं तरी ते मतदारांपर्यंत पोहोचविणे फारसं अवघड राहिले नाही.