
कबड्डीसारख्या देशी खेळाला आता जे वलय प्राप्त झाले, ते इतर खेळांना मिळवून दिले पाहिजे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धामध्ये यश मिळवले. तेव्हा न थांबता आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी यापुढे जीवतोड मेहनत केली पाहिजे. खेळाडूला योग्य मार्गदर्शन, साधनसामग्री दिल्यास महाराष्ट्रातून दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील, यात शंका नाही.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सेनादल वगळता देशातील सर्व राज्यांमध्ये महाराष्ट्राने प्रथम क्रमांक मिळवला आहे. प्रथम क्रमांक मिळवण्यासाठी ज्या खेळाडूंनी घाम गाळला, कष्ट घेतले आणि कौशल्य पणाला लावले, त्या सगळ्यांचे मनापासून अभिनंदन! त्याचबरोबर त्यांना प्रशिक्षण देणारे त्यांना मदत करणारे आणि शासनाचे सर्व पदाधिकारी, अधिकारी, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशन हे देखील या अभिनंदनास पात्र आहेत. त्या सगळ्यांचे ही मनःपूर्वक अभिनंदन! राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा अहमदाबाद येथे आयोजित करण्यात आली. या आयोजनामागे केवळ स्पर्धांना पाठबळ देणे तेवढाच नव्हता, तर आगामी गुजरात निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला गुजरातमधील त्यांच्या कामाचा बायोडेटा भक्कम करणे हापण होता. त्यानुसार त्यांनी गुजरातमध्ये या स्पर्धा भरून आपल्या कामगिरीचा आलेख वाढवला.
स्पर्धेच्या उत्तम नियोजनाबद्दल त्यांचेही अभिनंदन ! खेळांना प्रतिष्ठा देणे खेळाडूंचा सन्मान ठेवणे, याबाबत गेल्या पंधरा एक वर्षात आपण सजग झालो आहोत. एके काळी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये केवळ आपल्या खेळाडूंचा संघ पाठवणे आणि त्यानंतर पुन्हा त्यावर पुढच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत कोणतीही वाच्यता न करणे असा शिरस्ता होता. खरे तर शालेय जीवनापासून कला आणि क्रीडा याकडे शिक्षण विभाग आणि हा शिक्षण विभाग चालवणारे शासन प्रशासन अक्षम्य दुर्लक्ष करत असते. शाळेतील शारीरिक शिक्षणाचा शिक्षक म्हणजे शाळेमध्ये होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी हुकमाचा एक्का असतो. आजही लहान गावांमध्ये खेड्यापाड्यांमध्ये शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाला किती मानाचे स्थान असते, याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. तोच प्रकार कला शिक्षकांचा असतो. गायन, चित्रकलेचे शिक्षक पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी गाणे आणि त्याच्यामागे असणाऱ्या फलकावर सुंदर अक्षरात त्यांची नावे आणि विषय लिहिणे तसेच शाळेचे सरकार दरबारी पाठवले जाणारे अहवाल उत्तमरीत्या सजवून देणे एवढ्यासाठीच असतात.
क्रीडा आणि कला या जीवनासाठी किती मूलभूत तत्त्वांनी आवश्यक आहेत, याचे ज्ञान आणि जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्याची उत्तम यंत्रणा आणि तसा अभ्यासक्रम आखला जात नाही, हे विद्यार्थ्यांचे दुर्दैव आहे. मात्र, या परिस्थितीमध्ये मोठ्या शहरांमध्ये काही अंशी बदल होत चालला आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आज महाराष्ट्र पद तालिकांच्या तक्त्यांमध्ये प्रथम स्थानावर आहे. ३९ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ६३ कांस्य पदकांची कमाई करत एकूण १४० पदके आपल्या राज्याने मिळवली आहेत. सेनादलाचा संघ सुवर्णपदकांमध्ये आपल्यापुढे आहे त्यांना ६१ सुवर्णपदके मिळाली असली तरी त्यांची सर्व पदकांची कमाई १२८ इतकी आहे. त्यामुळे एकूण पदकांच्या क्रमवारीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे.
खेळाडूंना सोयी सवलती उपलब्ध करून देणे, त्यांना उत्तम साहित्य देणे, सुयोग्य मार्गदर्शन करणे त्याचबरोबर स्पर्धा काळात त्यांच्या वाहतुकीच्या सोयीपासून मानसिक स्वास्थ्यापर्यंत अनेक बाबींवर शासनाने प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे. मोदी सरकारने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक विजेत्या हर्षवर्धन राठोड यांना केंद्राचे क्रीडा मंत्री केले आणि त्यांनी या क्षेत्रात मूलभूत बदल करण्यास प्रारंभ केला. गाव पातळीपासून जिल्हा, राज्य, आंतरराज्य, राष्ट्रीय आणि मग आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा सराव खेळाडूंना विद्यार्थ्यांना दिला तरच ऑलिंपिक, विम्बल्डन यासारख्या क्रीडा प्रकारात आणि मानांच्या स्पर्धांमध्ये आपल्याला दर्जेदार कामगिरी करता येईल.