सर्वसामान्य दिवाळी शिधाच्या प्रतीक्षेत

वितरण थांबले?; ‘आनंदाचा शिधा’ काही दुकानापर्यंत पोहोचलाच नाही
मुंबई : शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून सरकारने अनेक निर्णयाचा धडाका लावला आहे. नुकतेच शिंदे सरकारकडून दिवाळीसाठी आनंदाचा शिधा ही योजना सुरू करण्यात आली.
राज्यातील सर्वसामान्यांची दिवाळी गोड व्हावी यासाठी फक्त १०० रुपयांमधे प्रत्येकी एक किलो रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल देण्याचा निर्णय राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आला. राज्यातील सात कोटी व्यक्तींना याचा फायदा होईल असे सांगण्यात आले. त्यासाठी घाईघाईत एका संस्थेला ५१३ कोटी रुपयांचे कंत्राट देखील देण्यात आले.
दरम्यान, अनेक रेशन दुकानांवर शिधा किटचा पत्ताच नाही. काही ठिकाणी सगळ्या वस्तू पोहोचल्या नसल्याने तर काही ठिकाणी किटच्या पिशव्या मिळाल्या नसल्याने वितरण रखडले आहे. हे किट दि. २० ऑक्टोबरपासून लोकांपर्यत पोहचेल, असे आश्वासन अन्न व नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. मात्र, अनेक ठिकाणी वितरण रखडल्याचे समोर आले आहे. सरकारच्या घोषणेनंतर या वस्तूंचे वेळेत वितरण झाले नसल्याची चर्चा आहे.
पुणे, नागपूर, सांगली जिल्ह्यातील रेशनिंग दुकानांमध्ये आनंदाचे रेशन पोहोचले आहे. दुसरीकडे बुलढाणा, औरंगाबाद, भंडारा जिल्ह्यांत अद्यापही रेशन पोहोचलेले नाही. त्यामुळे या जिल्ह्यातील नागरिक अद्याप दिवाळी शिधाच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसून येत आहे. दिवाळी तोंडावर आली असतांना सर्व जिल्ह्यातील रेशन दुकानात शिधा पोहोचेल का, तसेच दिवाळीच्या आधी सर्व लाभार्थ्यांपर्यंत किट पोहोचेल का, हा मुळात प्रश्न जनमानसात पसरला आहे.
‘शिधा’ कुठे पोहोचला?
पुणे – जिल्ह्यात वाटायच्या आनंदाच्या शिधाच्या साहित्यापैकी ५५ टक्के शिधा आला आणि तो रेशनिंग दुकानात पोहचल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ९ लाख १५ हजार ६६२ शिधा किटची गरज आहे.
बारामती – बारामती तालुक्याता २२० रेशनिंग दुकानांपैकी ७२ दुकानात किट पोहोचले आहे. तालुक्यात एकूण ८२ हजार २०० लाभार्थी कुटुंब १०० रुपयांच्या किटमध्ये १ किलो रवा, १ किलो साखर, १ लिटर पाम तेल, १ किलो चणाडाळ आणि एक शासनाची पिशवी देण्यात येणार आहे. एकूण १४८ रेशनिंग दुकानांमध्ये दोन दिवसांत हे किट पोहोचेल असे सांगण्यात येत आहे.
सांगली – जिल्ह्यात एकूण १३६१ रेशन दुकानदारांपैकी ३८९ रेशन दुकानदारापर्यत शिधा पोहचला आहे. आजपर्यंत ७० टक्के शिधा पोहचवला जाईल, असे पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नाशिक – जिल्ह्यात आनंदाच्या शिधा साहित्याचे एकूण ८ लाख लाभार्थी असून त्यासाठी ३२ लाख शिधा पाकिटांची गरज आहे.
नागपूर – शहरात ३ लाख ८५ हजार कुटुंब पात्र आहे. त्यांच्यासाठी २ लाख ९५ हजार साखरेचे पाकिट आले आहे. ३ लाख ८५ हजार तेलाचे पुडे आले आहे. ८० हजार रव्याचे पुडे आले आहे. तर ५० हजार चणा डाळीचे पुडे आले आहेत. तर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ४ लाख ११ हजार कुटुंब पात्र आहे.
नांदेड – जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आलेला नाही.
हिंगोली – किटमधील सर्व साहित्य हिंगोली जिल्हा प्रशासनाकडे आले. पण, किटच्या पिशव्या आल्या नाहीत त्यामुळे वाटप ठप्प आहे. हिंगोली जिल्ह्यात २,२१, ००० इतक्या किटची मागणी केली होती. तेवढे साहित्य उपलब्ध झाले.
धुळे – जिल्ह्यासाठी दोन लाख ९९ हजार लाभार्थी आहेत. मागणीच्या तुलनेत केवळ २० टक्के माल गोडाऊनला पोहचला आहे मात्र तो अद्याप रेशन दुकांनापर्यंत पोहचलेला नाही. २१ ऑक्टोबरपर्यंत रेशन दुकानात आनंद शिधा पोहचेल आणि २२ पासून वाटप सुरू होईल, असे सांगण्यात येते.
बुलढाणा – जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आलेला नाही.
वाशिम – जिल्ह्यात मालेगाव तालुक्याकरता फक्त चणा डाळ, वाशिम तालुक्यात साखर तर कारंजा तालुक्यात पाम तेल उपलब्ध आहे. येत्या २ दिवसात सरकारकडून रेशन कार्डवर १०० रुपयात मिळणाऱ्या वस्तू प्राप्त लाभार्थ्यांपर्यंत पोहचणार आहे.
औरंगाबाद – जिल्ह्यात अद्याप आनंद शिधा आलेला नाही.
पालघर – जिल्ह्यात ४ लाखाच्यावर लाभार्थी असून अजूनही १०० रुपयांचा आनंदाचा शिधा पूर्णपणे प्राप्त झाला नसल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी दिली. ज्या ४ वस्तू लाभार्थ्यांना मिळणार आहेत, त्या पूर्ण वस्तू प्राप्त झाल्याशिवाय आम्हाला वाटप करता येणार नाही, असे सांगण्यात येते.
भंडारा – जिल्ह्यात अर्धवट शिधा आला आहे, त्यामुळे वाटप रखडले आहे.