ताज्या बातम्यारणधुमाळी

“आपल्या टोपलीखाली झाकून पाहावं…”, भाजप आमदाराचा सुभाष देसाईंवर हल्लाबोल

मुंबई | Prasad Lad On Subhash Desai – ‘वेदांता-फाॅक्सकाॅन’ प्रकल्पानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प (Tata Air Bus Project) महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यासंदर्भात विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. तसंच हा प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. राज्यातील प्रकल्प गुजरातला नेण्यासाठी सत्तांतर झालं असल्याचा गंभीर आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी केला आहे. यासंदर्भात आता भाजप आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी सुभाष देसाई यांच्यावर निशाणा साधला आहे.

“महाविकास आघाडी जनतेची दिशाभूल करत आहे. 21 सप्टेंबर 2021 मध्येच एअरबस-टाटा प्रकल्प परत गेला होता. मला तर तेव्हाच्या उद्योगमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना तेव्हा प्रकल्प का नाकारला गेला हे विचारायचं आहे. सुभाष देसाई यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे”, असं प्रसाद लाड म्हणाले .

“येणाऱ्या प्रत्येक उद्योगाकडे किती टक्के मागत होतात हे आधी सुभाष देसाई यांना विचारायला हवं. भूषण देसाई कोणाकोणाला भेटत होते? दुबईत कशा बैठका होत होत्या? किती टक्क्यांची दलाली घेतली जात होती? मातोश्रीला किती टक्के पोहोचवायचं सांगितलं जात होतं? या गोष्टी जर आम्ही काढत बसलो तर मोठं प्रकरण समोर येईल. किती उद्योगांकडून किती पैसे घेतले, फाईल कशा फिरल्या याची सर्व माहिती प्राप्तिकर विभाग आणि सीबीआयकडे आहे. सुभाष देसाई यांनी आम्हाला तोंड उघडायला लावू नये,” असा इशाराही प्रसाद लाड यांनी दिला आहे.

पुढे प्रसाद लाड म्हणाले, “आम्ही पुराव्याशिवाय बोलत नाही. सुभाष देसाईच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीबद्दल हे सिद्ध झालं आहे. नवाब मलिक, अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार सिद्ध झाला आहे. अनिल परब यांची चौकशी सुरू आहे. संजय राऊत यांचं पत्राचाळ प्रकरण आहे. सुभाष देसाई ज्येष्ठ नेते आहेत, आम्ही त्यांच्या वयाचा, अनुभवाचा आदर करतो. पण त्यांनी अशाप्रकारे शिंदे, फडणवीस यांच्यावर आरोप करण्याआधी आपल्या टोपलीखाली झाकून पाहावं. वेळ पडल्यास पुरावे समोर आणू, असंही लाड यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये