“तिकडे विराट खेळत होता तेव्हा हिमांशू…”, अमृताने सांगितला भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यानचा खास किस्सा

मुंबई | Amruta Khanvilkar – प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने (Amruta Khanvilkar) तिच्या उत्कृष्ट अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. तसंच ती सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. तसंच आता अमृता ‘झलक दिखला जा’ या कार्यक्रमामुळे चर्चेत आहे. दरम्यान, अमृतानं एका मुलाखतीत अलिकडेच झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यानचा एक खास किस्सा शेअर केला आहे.
अमृता खानविलकरनं ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या नवऱ्याचा एक धम्माल किस्सा शेअर केला. हा किस्सा होता नुकत्याच पार पडलेल्या भारत- पाकिस्तान सामन्यादरम्यानचा. हा सामना पाहताना पती हिमांशू मल्होत्राची अगदीच वाईट अवस्था झाली होती असं या मुलाखतीत अमृतानं सांगतिलं आहे.
“हिमांशू रणजी क्रिकेट खेळला आहे. त्यामुळे त्याला क्रिकेटचं भारी वेड आहे. महेंद्र सिंह धोनीला तो देव मानतो. अर्थात भारताचा प्रत्येक सामना स्टेडियमला जाऊन पाहणं आम्हाला शक्य नसल्यानं जेव्हा शक्य असतं तेव्हा आम्ही टीव्हीवर मॅच नक्कीच पाहतो. त्यादिवशीही आम्ही भारत-पाकिस्तान सामना पाहत होतो.”
“हिमांशूचं क्रिकेटचं वेड आणि त्यातही भारत-पाकिस्तान सामना असल्यानं त्याची स्वत:ची वेगळीच काॅमेंट्री सुरू होती. यानं असं खेळायला हवं त्यानं तसं असं बरंच काही चाललं होतं. पण शेवटचे काही चेंडू उरलेले असताना त्याचा अक्षरश: श्वास अडकला होता. तिकडे विराट खेळत होता आणि अखेर भारतानं सामना जिंकला तेव्हा हिमांशू चक्क रडायला लागला होता. त्याला भावना अनावर झाल्या होत्या. रडू आवरत नव्हतं तो खूपच भावूक झाला होता”, असा खास किस्सा अमृतानं सांगितला.