“साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू”; चौकशीनंतर किशोरी पेडणेकरांची प्रतिक्रिया

मुंबई | Kishori Pednekar Enquiry – मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्यावर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पामध्ये घोटाळा (SRA Scam) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे आज (1 नोव्हेंबर) त्यांची दादर पोलिसांकडून अडीच तास चौकशी करण्यात आली. पोलिसांनी जे प्रश्न विचारले, त्यांची मला माहिती असलेली उत्तरं दिली, असं किशोरी पेडणेकरांनी चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितलं. तसंच यानंतर पोलिसांनी आपल्याला चौकशीसाठी बोलावलेलं नाही, असंही पेडणेकरांनी सांगितलं.
यावेळी किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “पोलिसांचं बोलावणं आलं तेव्हाच मी सांगितलं की तीन दिवस मी बिझी आहे, पण मी येणार चौकशीला. कर नाही तर डर कशाला? ती म्हण मी कायम ठेवली. अडीच तास पोलिसांची चौकशी झाली. पण बराच वेळ गप्पांमध्ये गेला. त्यानंतर प्रश्न विचारले त्यांची मी मला माहित असलेली उत्तरं दिली. तसंच प्रत्येक आरोपांना उत्तर देण्याची गरज नाही”, असा खोचक टोला पेडणेकरांनी किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) लगावला.
“ज्या पद्धतीनं हे रंगवलं जातंय त्यामधलं दहा टक्केही खरं नाही. साप म्हणून दोरी बडवण्याचा प्रकार सुरू आहे. मी कायद्याची लढाई लढत आहे. मी कोणत्याही आरोपांना उत्तर देणार नाही. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे. माझं निवेदन घेऊन जाणार आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मूळ शिवसैनिक म्हणून मी त्यांना भेटणार आहे. तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही भेट घेणार आहे”, असंही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.