राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप
![राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात, शिवसेना खासदाराचा गंभीर आरोप raj thackeray 1](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2022/11/raj-thackeray-1-780x470.jpg)
रत्नागिरी | Vinayak Raut – शिवसेनेचे खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन काम करतात, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. राज ठाकरेंनी मुंबईतील गट प्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह विरोधकांवर सडकून टीका केली होती. यावर राऊत यांनी भाष्य केलं आहे. ते रत्नागिरीत पत्रकार परिषदेत बोलत होते.
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारीला लागा. मी तुमच्या हाती महापालिकेची सत्ता आणून देतो, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यावर विनायक राऊत म्हणाले, त्यांनी फक्त स्वप्न पाहावीत. निवडणूक आली की आस्तित्व दाखवण्यासाठी असे मेळावे घ्यायचे. निवडणुकीच्यावेळी कोणाची ना कोणाची सुपारी वाजवायची हा धंदा मागील अनेक वर्षांपासून राज ठाकरेंनी चालू केलेला आहे. राज ठाकरे फक्त नक्कल करून राजकारण करत आहेत. बाळासाहेबांचं नाव घेऊन उद्धव ठाकरेंची नक्कल करायची. पायाला ठेच लागली तरी तुम्ही मुंबईला अॅडमीट होता. उद्धव ठाकरेंचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर होतंय ही राज ठाकरेंची पोटदुखी आहे”, अशी टीकाही राऊतांनी केली आहे.
दरम्यान, राज ठाकरेंनी 27 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगावमधल्या सभेत बोलताना उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला होता. “कालपरवापर्यंत मुख्यमंत्रीपदावर असलेले आणि आता बाहेर पडलेले तब्येतीचं कारण सांगून घरात बसले. एकनाथ शिंदेंनी रात्रीच्या रात्री कांडी फिरवली अन् आता हे सगळीकडे फिरत आहेत. यांच्यासारखं वागणारा मी नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी दिसेल तो हात हातात घेणारा मी नाही. मी यांच्यासारखा नाही. उद्धव ठाकरेंच्या अंगावर एकतरी केस आहे का? कधी भूमिका घेतलीच नाही. पैशासाठी, स्वार्थासाठी कधी हा कधी तो, मला सत्तेत बसवा अशी भूमिका घेतली. फक्त पैशासाठी आणि सत्तेसाठी याच्यासोबत त्याच्यासोबत गेले,” अशी टीका राज ठाकरेंनी केली होती.