ताज्या बातम्यारणधुमाळी

“सरकार बदलणार, त्यावेळी सर्वांचा हिशोब…”, संजय राऊतांचा इशारा

मुंबई | Sanjay Raut – शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. कोणतंही सरकार कायम राहत नाही. 2024 ला सरकार बदलणार आहे. त्यावेळी सर्वांचा हिशोब पूर्ण केला जाईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आयएनएस विक्रांत घोटाळा प्रकरणी (INS Vikrnat Scam Case) आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लिनचिट मिळाली आहे. यासंदर्भात बोलताना राऊतांनी इशारा दिला आहे. तसंच याप्रकरणी केंद्र सरकारला पत्र लिहणार असल्याचंही ते म्हणाले. आज (15 डिसेंबर) सकाळी ते नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते.

सरकार बदलल्यानंतर ज्या गोष्टी घडतात त्यातील एक गोष्ट म्हणजे किरीट सोमय्यांना मिळालेली क्लिनचिट. आयएनएस विक्रांतच्या संदर्भात पैसे गोळा झाले आहेत. पैशांचा अपहार झालाच आहे. राजभवनमध्ये पैसे गेले म्हणतात. राजभवन सांगतंय पैसे आलेच नाहीत. मग हाच भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा पुरावा आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना क्लिनचिट कशी मिळते हे विचारलं पाहिजे. आमच्या लोकांना मात्र क्लिनचिट मिळत नाही. हा ईडीच्या अखत्यारीतला विषय आहे. राष्ट्रीय संरक्षणाशी संबंधित विषय आहे, असं संजय राऊत म्हणाले.

पुढे ते म्हणाले, सरकार लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात आडकाठी आणू शकत नाही. त्यांना मोर्चाला परवानगी द्यावीच लागेल. कारण या देशात अजूनही लोकशाही आहे, हुकूमशाही नाही. घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले या दैवतांचा अपमान करतात. तरीही सरकार त्याचं समर्थन करतं. मग याविरोधात आम्ही मोर्चा काढायचा नाही का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.

राज्यपाल आणि भाजपचे नेचे यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांचा अपमान होत आहे. तसंच कर्नाटक सीमा वादाचा सुरू असलेला प्रश्न यावरुन महाविकास आघाडी चांगलीच आक्रमक झाली आहे. याविरोधात 17 डिसेंबरला महाविकास आघाडीच्या वतीनं मुंबईत विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. लोकशाहीत मार्गानं करण्यात येणाऱ्या आंदोलनात सरकार आडकाठी आणू शकत नाही. जर आम्ही मोर्चा काढावा असं तुम्हाला वाटत नसेल तर तुम्ही राज्यपालांना हटवायला पाहिजे होतं. भाजपच्या प्रवक्त्यांवर तुम्ही कारवाई करायला हवी होती. कारवाई केली नाही मग आम्ही आता मोर्चा काढणार, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये