पंतप्रधान मोदींच्या मातोश्री हिराबेन अनंतात विलीन

गांधीनगर | Heeraben Modi Demise – पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मातोश्री हिराबेन मोदी (Heeraben Modi) यांचं निधन झालं आहे. वयाच्या 100 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तसंच हिराबेन आता अनंतात विलीन झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला मुखाग्नी दिला. हिराबेन यांच्यावर गुजरातमधील गांधीनगर (Gandhinagar) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. अत्यंत जड अंतकरणानं पंतप्रधान मोदींसह त्यांच्या भावांनी हिराबेन यांना अखेरचा निरोप दिला.
आज पहाटे साडेतीन वाजता (30 डिसेंबर) हिराबेन यांचं निधन झालं. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान आज पहाटे त्यांची अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांचे पार्थिव पीएम मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं. तिथे पंतप्रधान मोदी पोहोचले आणि त्यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदींनीही आईच्या पार्थिवाला खांदा दिला.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईच्या निधनानंतर ट्विटरवरून शोक व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा असं मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.