मोठी बातमी! नाशिकमध्ये अग्नितांडव, चालत्या बसला लागली भीषण आग
![मोठी बातमी! नाशिकमध्ये अग्नितांडव, चालत्या बसला लागली भीषण आग nashik bus fire](https://rashtrasanchar.com/wp-content/uploads/2023/01/nashik-bus-fire-780x470.jpg)
नाशिक | Nashik Bus Fire – गेल्या काही दिवसांपासून नाशिक (Nashik) जिल्ह्यात अग्नितांडव सुरूच आहे. आज (18 जानेवारी) पुन्हा एकदा आगीची घटना समोर आली आहे. नाशिकमध्ये एका चालत्या बसला भीषण आग (Nashik Bus Fire) लागल्याची घटना घडली आहे. चांदवड घाटात एक बस आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. मात्र, वेळीच चालकानं प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. (Nashik Bus Fire)
मिळालेल्या माहितीनुसार, मालेगाववरून नाशिककडे येणारी बस चांदवड घाटात आली असताना अचानक या बसने पेट घेतला. त्यावेळी बस चालक आणि कंडक्टरनं प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना तात्काळ खाली उतरवलं. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. तसंच घटनेतील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. चालकाच्या सतर्कतेमुळे 35 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत.
चांदवड – शहादा ते मुंबई जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात भीषण आग लागली. तसंच या आगीनं रौद्र रूप धारण केलं. मात्र, बस चालकानं सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी केली आणि बसमधील 35 प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढलं. त्यानंतर मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीनं त्वरित घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवलं.
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून नाशिकसह अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्यानं आगीच्या (Fire Incident) घटना समोर येत आहेत. औरंगाबाद नाक्यावरील मिरची चौफुलीवरील भीषण आगीच्या घटनेनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं होतं. तर इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव जवळील जिंदाल पॉलिफिल्म कंपनीला लागलेल्या भीषण आगीत तीन जणांना आपला प्राण गमावावा लागल्याची घटना घडली होती. तसंच आता पुन्हा नाशिकच्या चांदवड घाटात चालत्या बसला भीषण आग (Nashik Bus Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. मात्र, आग का लागली याचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.