“सततच्या धावपळीमुळे माझं 10 किलो वजन घटलंय”; एकनाथ शिंदेंच्या वक्तव्यावर विरोधकांची टीका

पुणे | मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) महाराष्ट्रभर दौरे करून कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सगळ्या धावपळीमुळे आपले वजन जवळपास 10 किलोने कमी झाल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी शनिवारी पुण्यात भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat) यांनी भेट घेतली. यावेळी गप्पा मारत असताना एकनाथ शिंदे यांनी सततची धावपळ आणि ओढाताण यामुळे आपले वजन घटल्याचे बापट यांना सांगितले. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर आधी ते सूरत, त्यानंतर गुवाहाटीला समर्थक आमदारांसोबत बराच काळ राहिले. त्यानंतर महाराष्ट्रात येऊन मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतरही एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय पातळीवरील बहुतेक कार्यक्रमांना उपस्थित असतात. इतकचं नाही तर अगदी स्थानिक पातळीवरील कार्यक्रम आणि सणांनाही एकनाथ शिंदे आवर्जून जात असतात. या माध्यमातून शिंदे गटाची ताकद वाढवण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र दिसून येते. परंतु, या सगळ्या धावपळीत एकनाथ शिंदे यांची प्रचंड ओढाताण होत असल्याचे आता समोर आले आहे.
नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
एकनाथ शिंदे यांनी आपले वजन घटल्याचे वक्तव्य केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी शिंदेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेत होते तेव्हा त्यांना कोणतही टेन्शन नव्हतं. त्यामुळे त्यांचे वजन वाढत होते. आता एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे एजंट झाले आहेत. मोदी-शाह यांच्या टेन्शनमुळेच एकनाथ शिंदे यांचे वजन कमी झाल्याची खोचक टीका नाना पटोले यांनी केली आहे.