‘आप’ला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

बेंगळूर | Karnataka Assembly Election – कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Election) सर्व पक्ष जोमानं तयारीला लागले आहेत. अशातच, आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. बेंगळुरूचे माजी पोलीस आयुक्त आणि आप नेते (Aam Aadmi Party) भास्कर राव (Bhaskar Rao) यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्ष भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
आज (1 मार्च) भास्कर राव यांनी भाजपचं सदस्यत्व घेतलं. भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कटील (Nalin Kumar Kateel) यांनी भास्कर रावांचा पक्षात प्रवेश करुन घेतला आहे. तसंच माध्यमांशी संवाद साधताना भास्कर रावांनी ‘आप’वर हल्लाबोल केला.
भास्कर राव म्हणाले की, “‘आप’मध्ये भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पक्ष निधी गोळा केला जातो. त्यामुळे आता ‘आप’चा विकास होऊ शकत नाही. ‘आप’च्या दोन मंत्र्यांचं तुरुंगात जाणं लज्जास्पद आहे. काल सीबीआयनं अबकारी घोटाळ्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. तसंच माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहेत.”
“पंतप्रधान मोदींपासून (PM Narendra Modi) मी खूप प्रेरित आहे. मी पंतप्रधानांची कामं पाहून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केला आहे. भाजपमध्ये मी अधिक योगदान देऊ शकतो, असं मला वाटतं”, असंही भास्कर राव म्हणाले.
दरम्यान, भास्कर राव यांनी गेल्या वर्षी 4 एप्रिलला ‘आप’मध्ये प्रवेश केला होता. भास्कर राव यांना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचं सदस्यत्व दिलं होतं. तसंच आता भास्कर राव यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानं ‘आप’साठी मोठा धक्का मानला जात आहे.