राजकारणात खळबळ करण्याची क्षमता असणाऱ्या दोन युवराजांची भेट, भावी युतीची नांदी?

हैद्राबाद : (Aaditya Thackeray On K. T. Rao) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे हे आज तेलंगाणाच्या दौऱ्यावर असून यावेळी त्यांनी तेलंगानाचे नेते के टी रामाराव यांची भेट घेतली. के टी आर हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचे सुपुत्र आहेत तसंच तेलंगना सरकारच्या मंत्रिमंडळातील अनेक महत्वाची खाती ही त्यांच्याकडे आहेत .
एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर आदित्य ठाकरे मागील बऱ्याच दिवसांपासून वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. विरोधी पक्षांची मजबूत आघाडी बनवण्याचं काम त्यांच्याकडून केलं जात आहे. यापूर्वी तेजस्वी यादव यांची आदित्य ठाकरेंनी भेट घेतली होती. तसंच आगामी काळात ते अखिलेश यादव यांच्यासोबत देखील त्यांची भेट नियोजित आहे.
आगामी वर्ष हे निवडणूकांचं वर्ष असल्याचं म्हटलं जात आहे. येत्या काळात महाराष्ट्रात महानगरपालिका तसेच राज्यातील विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका जवळ येत आहेत त्यामुळे येत्या काळात राजकीय समीकरणे जुळवून घेण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्याकडून भक्कम आघाडीसाठी प्रयत्न केले जात आहेत. तसेच तेलंगणा दौऱ्यादरम्यान गीतम विद्यापीठातर्फे युवा राजकारणी आयोजित संवाद कार्यक्रमात आदित्य ठाकरे विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.
राज्यात सत्तांतरण झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी दौऱ्यांचा धडाका लावला आहे. मागील २-३ महिन्यात त्यांनी संपुर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अनेक छोट्या मोठ्या सभा घेतल्या पक्षाला पुन्हा नवसंजीवनी देण्यासाठी काम करत आहेत.