“अजित पवार मुख्यमंत्री होणार…” आमदार अमोल मिटकरी असं का म्हणाले?

अकोला | राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपात जाऊ शकतात किंवा भाजपाला पाठिंबा देऊ शकतात अशा चर्चा सुरु आहेत. आमदार अण्णा बनसोडेंसह तीन आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. राज्यात ही चर्चा रंगली आहे ती न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या बातमीने. कारण अजित पवारांकडे 40 आमदारांच्या सह्यांचं पत्र तयार असल्याची बातमी न्यू इंडियन एक्स्प्रेसने दिली होती. त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी यावर भाष्य करत मोठे वक्तव्य केले आहे. याच दरम्यान अमोल मिटकरी यांनी अजित पवार मुख्यमंत्री होणार आहे असेही वक्तव्य केले असून आम्ही अजित पवार यांच्यासोबत असल्याचे म्हंटले आहे. त्याच दरम्यान सध्या सुरू असलेल्या चर्चा या मिथ्या चर्चा आहेत स्वतः पवार साहेबांनी यावर भाष्य केल्याचे मिटकरी म्हणाले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही मिनिटांपूर्वी बोललेत. जे तुमच्या मनात आहे ते आमच्या मनात नाही. त्यामुळे भाजपकडून ह्या काही कंड्या पिकवल्या गेल्यात, ते तपासले पाहिजे. चाळीस आमदारांना कुठलेही पत्र राज्यपालांना देण्याचा प्रश्न नाही असेही मिटकरी यांनी म्हंटलं आहे. आमदार त्यांच्या खाजगी कामानिमित्त विधान भवन येथे अजित पवार यांना भेटायला गेले आहेत. अजित दादा कालपासून देवगिरीला होते. आता विधान भवनला आहेत. त्याच्यामुळे या चर्चेत काहीही तथ्य नाही असेही आमदार अमोल मिटकरी यांनी म्हंटले आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये गटबाजी आहे असे मला पक्षात प्रवेश करण्यापूर्वी वाटत होतं. त्यानंतर मला पक्षात काम करत असतांना तसं वाटत नाही. आमचा पक्ष भाजप सारखा पक्ष नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये गटबाजी नाही असेही अमोल मिटकरी यांनी म्हंटलं आहे. पुढील काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री अजित पवार असतील पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे असतील. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेकडून या ज्या वावड्या उठवल्या जात आहे. त्याला कुठलाही अर्थ नाही असे सांगत आम्ही पक्षाबरोबर आणि अजित पवार आमचे नेते आहेत त्यांच्यासोबत आहोत असेही म्हंटले आहे.