यंदा आशा भोसलेंना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर

मुंबई | यावर्षीच्या ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून यंदा या पुरस्काराच्या मानकरी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ठरल्या आहेत. दरम्यान विद्या बालन, पंकज उदास, प्रसाद ओक यांच्यासह अनेकांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर करण्यात आला असून, गायिका उषा मंगेशकर यांनी या पुरस्कारांची घोषणा केली. पंडित हृदयनाथ मंगेशकर या पुरस्कार समारंभाच्या अध्यक्षस्थानी असतील.
मंगेशकर कुटुंब गेल्या तेहतीस वर्षांपासून नोंदणीकृत सार्वजनिक चॅरिटेबल ट्रस्ट, मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चालवत आहेत, मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे संगीत, नाटक, कला, वैद्यकीय, व्यावसायिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रातील दिग्गजांचा सत्कार केला जातो. यंदाचा प्रतिष्ठित दीनानाथ पुरस्कार आणि ट्रस्टच्या इतर पुरस्कारांचा वितरण सोहळा हा 24 एप्रिल 2023 रोजी श्री षण्मुखानंद हॉल, सायन येथे आयोजित करण्यात आला आहे. दरवर्षी हा कार्यक्रम 24 एप्रिल रोजी म्हणजेच मास्टर दीनानाथजीच्या स्मृतिदिनी आयोजित केला जातो.
गेल्या वर्षीपासून, मंगेशकर कुटुंबीय आणि ट्रस्टकडून भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ दिला जातो. तो. हा पुरस्कार दरवर्षी फक्त एकाच अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या राष्ट्रासाठी, लोकांसाठी आणि समाजासाठी अतुलनीय, नेत्रदीपक आणि अनुकरणीय योगदान दिले आहे. गेल्यावर्षी या पुरस्काराचे मानकरी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ठरले होते.