‘टीडीएम’ चित्रपटाला पुणेकरांचा पाठिंबा; भव्य ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन

TDM Marathi Movie : ‘ख्वाडा’,’बबन’ या दर्जेदार सिनेमांनंतर आता भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade) यांचा ‘टीडीएम’ (TDM) हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. पण सिनेमा चांगला असूनही शो मिळत नसल्याने कलाकारांसह प्रेक्षकांनी देखील दु:ख व्यक्त केले. त्यामुळे दिग्दर्शक भाऊसाहेब कराडे यांनी चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या चित्रपटाला शो मिळावे यासाठी शिरूरमध्ये शहरातून नागरिकांनी थेट रस्त्यावर उतरून ट्रॅक्टर रॅली काढली होती. एखादया चित्रपट दिग्दर्शक व चित्रपट समर्थनासाठी ग्रामीण भागातील नागरीक एकवटल्याचे दुर्मिळ चित्र यावेळी दिसुन आले.
शिरुर परिसरातील गव्हाणेवाडी येथील निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांचा ‘टीडीएम’ हा मराठी चित्रपट पुण्यासह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित झाला होता. परंतु चारच दिवसांत अनेक मोठ्या चित्रपटगृहांमधून अचानकपणे हा चित्रपट काढून टाकण्यात आला.तर अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला. यामुळे खचलेल्या भाऊराव कऱ्हाडे व चित्रपटातील कलाकारांनी टोकाचा निर्णय जाहीर केला. त्यामुळे शिरूरमधील भाऊराव कऱ्हाडे यांची मित्रमंडळी व समर्थक एकवटले. कऱ्हाडे यांच्या पाठीशी उभे राहत चित्रपटाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिरूर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला .
भाउराव तुम्ही खचु नका व निराश होवू नका आम्ही सर्वजन तुमच्या पाठीशी आहोत . शिरुर गव्हाणेवाडी परिसरातील ग्रामीण भागातील तरुण भाउरावच्या रुपाने चित्रपटसृष्टीत नवे काही करु पाहत आहे. आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी भरभक्कम पणे उभे असल्याची भावना शिरुरकरांनी व्यक्त केली. शेतकरी, रिक्षाचालक, वीटभट्टी मजुर ते चित्रपटसाठी शेत जमीन विकणारा ते राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेता अशी भाउरावांची रुपे आम्ही पाहिली आहेत. त्यामुळे त्यांना प्रोत्साहन देणे ही आमची जबाबदारी असल्याचंही काहीनी सांगितले.