“किती आले अन् किती गेले, पण नरेंद्र मोदी सर्वांना…”, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना खोचक टोला

मुंबई | CM Eknath Shinde – आज (26 मे) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते शासकीय योजनांचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलताना एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. किती आले अन् किती गेले पण एकटे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) सर्वांना भारी पडले, असा टोला एकनाथ शिंदेंनी लगावला आहे.
यावेळी एकनाथ शिंदे म्हणाले की, संसद भवनाचं उद्या उद्घाटन करण्यात येणार आहे. पण याला विरोध करण्यात येत आहे. संसद भवन हे एक पवित्र मंदिर आहे. सर्व खासदार तिथे बसतात, जनतेचे प्रश्न मांडतात. हे तर एक ऐतिहासिक काम असून याला का विरोध करतात. या ऐतिहासिक कामाला विरोध करतात याचा अर्थ ही पोटदुखी आहे. या कामाचं श्रेय मोदींना मिळेल म्हणून विरोधकांची पोटदुखी सुरू आहे.
केजरीवाल हे मुंबईत येतात आणि ते एकाला भेटतात, दुसऱ्याला भेटतात त्यानंतर दुसरे तिसऱ्याला अन् तिसरे पाचव्याला भेटत आहेत. हे त्यांच्या दारी अन् ते त्यांच्या दारी जात आहेत. मात्र, आपण कोणाच्याही दारी जात नाही, त्यामुळे किती आले किती गेले आणि कितीही आघाड्या झाल्या तरी एकटे मोदी सर्वांना भारी पडले आहेत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.