भाजपचे इनकमिंग बंद? मुनगंटीवारांच्या विधानाने होतेय चर्चा

पुणे | Sudhir Mungantiwar – भारतीय जनता पक्ष (BJP) आता हाऊसफुल्ल झालेला आहे, असे विधान भाजपचे वरिष्ठ मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी नुकतेच केले. याचा अर्थ महाराष्ट्रात भाजपने मोठ्या पातळीवर किंवा मोठ्या नेत्यांसाठी ‘इनकमिंग’ बंद केले आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
चार दिवसांपूर्वी मुनगंटीवार यांनी प्रवेशबंदी सूचकपणे बोलून दाखवली तरीही, रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पक्षांतराच्या वावड्या उठल्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा रविवारी पुण्यात होते. जयंत पाटील यांनी शहा यांची भेट घेतल्याच्या बातम्या पसरल्या. नंतर दुपारी जयंत पाटील यांनी बातमीचा इन्कार केला. या उलटही काँग्रेसच्या काही नेत्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्या येत आहेत. पक्ष फोड्यांचा पक्ष असे भाजपचे वर्णन केले जात आहे. महाराष्ट्रात आधी शिवसेना फोडली आणि अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस फोडली, असा आरोप भाजपवर केला जात आहे.
जनमानसात त्यातून पक्षाविषयी प्रतिकूल मत व्यक्त होत आहे. ज्या पक्षावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप पंतप्रधान मोदी यांनी केला. ते शब्द हवेत विरण्यापूर्वी त्या पक्षाच्या अजित पवार यांना भाजपने आपल्या परिवारात घेवून उपमुख्यमंत्री केले. तत्पूर्वी शिवसेना फोडली आणि एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले, असे आक्षेप आहेत. शिंदे यांच्याशी भावनिक संबंध असून पवारांशी राजकीय मैत्री आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगूनही लोकांना आणि भाजपमध्येही अनेकांना ते पटलेले नाही. भाजपची प्रतिमा फक्त महाराष्ट्रात नव्हे तर देशात बिघडली असे जाणवले आणि पक्ष आता हाऊसफुल्ल झाला, असे सांगितले जावू लागले आहे. मोदी-शहा यांनी पवार, शिंदे यांची स्तुती केल्याने भाजपमध्येच नाराजी आहे. पवार यांच्याशी चार हात केलेले भाजपमधील नेते जास्त अस्वस्थ आहेत.