शेतकऱ्याचा संताप अनावर! थेट मंत्रालयातील जाळ्यांवर मारल्या उड्या; काय आहे कारण?

मुंबई : (Farmers Protest At Mantralaya) अप्पर वर्धा धरणग्रस्त सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मंत्रालयातील सुरक्षा जाळींवर उड्या मारून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. धरणग्रस्तांना न्याय देण्याची मागणी शेतकरी करत आहे. यावेळी पोलिसांनी शेतकऱ्यांना ताब्यात घेतले आहे. शेतकऱ्यांना आझाद मैदान पोलिस ठाण्यात पाठवले आहेत. पोलिसांनी १२ ते १५ शेतकऱ्यांना ताब्यात घेतले. उद्यापर्यंत सरकारने निर्णय न घेतल्यास आत्महत्या करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
विदर्भातील अमरावती भागातून शेतकरी मंत्रालयात आले आहेत. धरणग्रस्तांच्य प्रश्नाबाबत सरकार गंभीर नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी परिसरामध्ये अप्पर वर्धा धरण आहे. १०३ दिवसांपासून हे शेतकरी मोर्शीच्या तहसिलदारांच्या कार्यालयासमोर आंदोलन करत होते. मात्र न्याय न मिळाल्याने शेतकऱ्यांनी थेट मंत्रालयात आक्रमक आंदोलन केले.
या आंदोलनातील एका शेतकऱ्याला भोवळ आली असून त्याला उपचाराकरीता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. १९७२ साली झालेल्या प्रकल्पाचा योग्य मोबदला न मिळल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. तसेच प्रकल्पग्रस्तांना नोकरीत प्राधान्य मिळाले नाही.
काय आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या?
– शासनाकडून मिळणाऱ्या मोबदल्याची फरकाची रक्कम व्याजासह देण्यात यावी.
– प्रत्येक प्रकल्पग्रस्तास पुनर्वसन कायद्यानुसार देय जमीन लाभक्षेत्रात वा इतरत्र देण्यात यावी.
– प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र धारकास शासकीय निमशासकीय सेवेत समावून घ्यावे. त्याकरीता आरक्षण मर्यादा ५% वरून १५% एवढी करण्यात यावी. अन्यथा प्रमाणपत्र धारकाला २० ते २५ लक्ष रुपये सानुग्रह अनुदान देण्यात यावे.
– जलसंपदा विभागाकडे उप वापरात न येणारी जमीन धरणग्रस्तांना उदनिर्वाह करता कायमस्वरूपी देण्यात यावी.
१०३ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषण संदर्भात सरकारने आमच्याशी योग्य चर्चा करावी. अन्यथा याही पेक्षा उग्र स्वरूपाचे आंदोलन करून झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागविण्याचे काम आम्ही करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.